पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजही काही विशेष उपयुक्ततेचे क्रांतीकारी दूरदर्शी संशोधन शक्य असेल तर गुप्त ठेवलेच जाते. संशोधकांना, त्यापेक्षाही उद्योजकांना जेव्हा पेटंटच्या मर्यादित अवधीच्या संरक्षणापेक्षा संशोधनातील जटीलताच अधिक काळ संरक्षण देईल असे वाटते तेव्हा पेटंट घेतले जात नाही. काही वेळा हा अंदाज बरोबर ठरतो, काही वेळा चुकतो.
संशोधकांच्या प्रेरणा कोणत्या?
 संशोधकांना त्यांच्या सिद्धींवर विशेष हक्क किंवा आर्थिक लाभ उपलब्ध करून दिल्यामुळे संशोधनाला उत्तेजन मिळते असे कोणी म्हटले तर त्यावर मोठा वाद होण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या प्रेरणा कोणत्या? पदवी, सन्मान किंवा अर्थलाभ याकरिता संशोधन होत नाही असे नाही. पण, कोपर्निकस किंवा न्यूटन यांच्यासारख्या सैद्धांतिकांची आयुष्यभरची तपस्या काही लाभान्वेषी नव्हती. एडीसन, मार्कोनी, बेल यांच्यासारख्या, सर्व मनुष्यजातीला उद्धरणाऱ्या संशोधकांच्या मनात काही द्रव्यापेक्षा होती असे दिसत नाही. किंबहुना, दुसऱ्या महायुद्धापर्यंत तरी बहुतेक मोठमोठे शोध हे तुटपुंज्या साधनसामुग्रीने आणि संशोधकाला धड पोटभर खाण्याची ददात अशा अवस्थेत लागलेले आहेत. मोठ्या शोधांशी ज्यांची नावे निगडीत आहेत अशांच्या जीवनचरित्रांवरून त्यांच्यावर धन आणि मानाच्या आमिषाचा काही मोठा प्रभाव होता असे दिसत नाही. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. मोठी विचित्र गोष्टी अशी की शांततेच्या काळात जीवन सुखद करणारे अनेक शोध युद्धातील धुमश्चक्रीच्या गरजेमुळे लागले आहेत. एखादा मोठा क्रांतीकारी शोध लागला म्हणजे एक नवे दालन खोलले जाते. आणि त्या दालनाचा अंदाज घेण्याकरिता संशोधन कार्याची एक मोठी लाट उसळी घेऊन येते. अगदी नोकरमान्या व्यावसायिक शास्त्रज्ञांनी पगारापोटी, पदवीसाठी लावलेले सगळेच शोध काही थातुरमातुर असत नाहीत. त्यातही काही सज्जड उपलब्धी आहेत.

 पण, हे सगळे गृहीत धरूनही एक गोष्ट स्पष्ट आहे की जेथे संशोधनाला वाव आहे, उत्तेजन आहे आणि संशोधकांचा मान आहे तेथे नवनवीन संशोधनाची लयलूट चालते. समाजवादी साम्राज्याच्या ऱ्हासाची आर्थिक, सामाजिक, राजकीय अनेक कारणे आहेत; पण एक महत्त्वाचे

३४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने