जातीतही घरोघर आणि माणसोमाणशी ते गुदमरवून टाकण्याची प्रवृत्ती याचा साहजिक परिणाम असा झाला की सगळा देश मागासलेला राहिला आणि बाबराच्या तोफांनी आणि युरोपियनांच्या शिडांच्या गलबतांनी त्याला गुलाम बनविले.
'पेटंट' चा जन्म
भारताखेरीज इतर देशांत, विशेषतः पाश्चिमात्य देशांत संशोधन लपविण्याची प्रवृत्ती नव्हती असे नाही. पण, व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या विकासानंतर अशी रहस्ये राखणे शक्य राहिले नाही. कोण एक नवा शोध लागला तर तो कारखान्यात आणि व्यापारात सिद्ध झाला तरच त्याचा उपयोग. शोधवस्तू एकदा सर्वसामान्य ग्राहकाच्या हाती गेली की त्यातील युक्ति, क्लृप्ती जगजाहीर होण्यास कितीसा वेगळ लागणार? पण म्हणजे, एकाच समाजातील एका संशोधकाने जे सिद्ध केले तेच करण्यासाठी इतरांनीही कष्ट, काळ आणि साधने व्यर्थ दवडायची? त्याशिवाय, संशोधित वस्तू तयार करण्याची काही खास कसबे, पद्धती, युक्त्या, रहस्ये असणारच. संशोधनाचा फायदा संशोधकाला मिळाला पाहिजे, उद्योगजकाला मिळाला पाहिजे पण त्याबरोबर संशोधनातील सिद्धांत आणि तंत्रज्ञान बंदिस्त तर होता कामा नये; या हेतूने वेगवेगळ्या देशांत नियम आणि कायदे करण्यात आले. संशोधकाला शोधाच्या जनकत्वाने काही विशेष हक्क मिळाले पाहिजेत हे खरे, पण जन्मदात्या आईबापांचासुद्धा अगदी पुरुषोत्तम पुत्रावरसुद्धा हक्क बालपणपुरताच मर्यादित असतो. संशोधनाचे श्रेय आणि त्यातून मानवजातीच्या होणाऱ्या लाभाचा एक अंश संशोधकाला मिळाला पाहिजे. पण त्याकरिता अट अशी की त्याचे सगळे संशोधन, सिद्धी, युक्त्या, क्लुप्त्या, रहस्ये त्याने तपशीलवार लेखी समाजाकडे नोंदविली पाहिजे. तेव्हा त्याला विशेष हक्क मिळेल आणि तो हक्क अमर्याद काळापर्यंत असणार नाही. संशोधनाच्या वकुबाप्रमाणेच काही पाचदहावीस वर्षांपुरताच मर्यादित असेल.
खास हक्क म्हणजे पेटंट हा काही सिद्धांत आणि सिद्धी गुलदस्तात ठेवण्याचा मार्ग नाही. समाजाला ते ज्ञान उपलब्ध करून देण्याबद्दल समाजाने संशोधकाला मर्यादित काळापर्यंत दिलेला तो उपभोगाचा अधिकार आहे.
पण म्हणजे काही, सर्व शोधांचे पेटंट घेतले जातात असे नाही.