पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिवविण्याकरिता, शेकोटी करता, उजेडाकरिता किंवा कच्चे मास भाजण्याकरिता कोणी केला असेल त्या आपल्या महापूर्वजाचे नाव अज्ञात आहे. निश्चितच, थोड्याफार अंतराने वेगवेगळ्या प्रदेशात अनेक मानवांना हा शोध स्वतंत्रपणे लागला असेल. आणि मग त्याचा वापर मोठ्या झपाट्याने पसरला असावा. त्याच्या प्रसारावर नियंत्रण ते कसे ठेवणार? पण ही असंभाव्य वाटणारी गोष्टही अर्यावर्तात प्रत्यक्ष घडली. अग्नी सहजसिद्ध करण्याचे अजून जमलेले नव्हते आणि जंगलातील वणवा काही सगळ्या हंगामात लागत नाही. अशा काळात अग्नी जतन करण्याचे आणि त्याबरोबरच अग्नीवर मक्तेदारी ठेवण्याचे जे जगात कोठे जमले नाही ते अग्निहोत्राने सिद्ध झाले. आपल्या देशाची ही एक परंपराच आहे. वंशपरंपरेने मिळालेले असो, अपघाताने जमलेले असो का प्रयासाने साध्य केलेले असो - जे काही विशेष ज्ञान किंवा सिद्धी असेल ती गुप्त ठेवायची आणि त्या मक्तेदारीच्या आधारावर स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे वर्चस्व बसवायचे. कोणा गुरुला काही विद्या संपादन झाली की त्याने मोठ्या मुश्किलीने, दिली तर, एखाद्या पट्टशिष्याला देऊ करायची. नाही तर, गुरुबरोबरच ती विद्याही लयाला जायची. तंत्रमंत्र, जारणमारण, जादूटोणा, जडीबुटी आणि कविकल्पना यांच्या वावदूक वल्गना सोडल्यास आमच्याकडे संशोधन असे फारसे झालेच नाही. वर्षानुवर्षांच्या अनुभवाने जे काही थोडेफार समजले ते लपवून ठेवण्यात शक्ती खर्च केली. अगदी आजदेखील अशा प्रकारांच्या कथा ऐकायला मिळतात. 'कोणा एका कातोड्याला विष उतरविण्याची हमखास विद्या येत होती, पण आता तो मेला आणि त्याबरोबर त्याची विद्याही गेली.' अशा आणि अशासारख्या गोष्टी हरहमेशा कानी पडतात. सिद्धी मर्यादित ठेवून फायदा मिळविण्याची बुद्धी किती, सिद्धी इतरेजनांस दिल्यास नष्ट होते या विश्वासाचा परिणाम किती आणि झाकली मूठ सव्वा लाखाची, बंदच बरी अशा कावेबाजपणाचा भाग किती हे सांगणे कठीण आहे; पण पिढ्यान् पिढ्या जे हाती येईल ते धन आणि विद्याकण लपवून ठेवण्याची आमची परंपरा आहे. जातिव्यवस्थेने ही पद्धती चालूही शकली.

 विद्या दिल्याने वाढते, साठवून ठेवण्याने संपून जाते असे एक संस्कृत सुभाषित आहे. एका लहानशा जातीची ज्ञानावर संपूर्ण मक्तेदारी आणि त्या

३२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने