४. बुद्धिसंपदेच्या चाच्यांचा कांगावा
मनुष्याची गुणात्मक उत्क्रांती
हजारो हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पाठीवर आजच्या माणसाशी काहीही सारखेपणा नसलेला माणसाचा पूर्वज दोन पायांवर उभे राहून कमरेत थोडा वाकलेला डुलत डुलत चालू लागला. त्या अवस्थेपासून आजच्या मनुष्याची उत्क्रांती होण्यास प्रचंड कालावधी लागला. या काळात माणसापेक्षा खूपच प्रचंड, म्हणजे अगदी पर्वतप्राय आकाराचे प्राणी नष्ट झाले. सहजतेने या झाडावरून त्या झाडावर छलांगे मारण्याची दैवी देणगी असलेले प्राणीही बाजूस पडले. एका उड्डाणात कित्येक कोस, दऱ्याखोरी, नद्या-सरोवरे ओलांडून जाण्याइतकी पंखांची ताकद असलेले पक्षीही बाजूला पडले. या सर्वांशी तुलना करता ज्याच्या अंगी फारशी ताकद नाही, कोणती विशेष करामत नाही असा माणूसप्राणी टिकून राहिला, एवढेच नव्हे तर, त्याने सगळ्या पृथ्वीवर आणि आकाशातही आपली निरंकुश सत्ता प्रस्थापित केली.
इतर प्राण्यांप्रमाणे, निसर्गात तयार मिळणारे अन्न गोळा करून किंवा शिकार करून मिळविण्याचे त्याने केव्हाच मागे टाकले. शेती केली. शहरे वसवली. पंचमहाभूतांवर ताबा मिळविला. विजेलासुद्धा वेसण घातली. जमिनीवरून, पाण्यावरून अगदी हवेतूनसुद्धा प्रवास करण्याचे कसब संपादले. सोयीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या, उंचीच्या इमारती बांधल्या. वेगवेगळ्या क्लृप्त्यांचे कारखाने बनविले.
सामान्य पशुपक्ष्यांप्रमाणे पाण्याच्या प्रवाहात तोंड घालून मिळेल तसल्या पाण्याने तहान भागविण्याने त्याची तहान भागेना. म्हणून वेगवेगळ्या भगीरथ प्रयत्नांनी त्याने पाणी हवे तिथे, हवे तसे हजर होईल अशी किमया साधली. कोणत्याही मोसमास मनाला भावेल ते मनसोक्त विविध रसांचे, स्वादांचे अन्न चुटकीसरशी समोर येईल अशी व्यवस्था केली. जी गोष्ट पाण्याची आणि अन्नाची तीच हवेची, निवाऱ्याची, वस्त्रप्रावरणांची; तीच गोष्ट इतर सगळ्या गरजाची आणि हौसमौजाची. अमुक एक गोष्ट असू शकते ना, मग ती आपल्या पदरी असलीच पाहिजे अशा हव्यासाने मनुष्यप्राणी स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत गेला.