शेतीमालाच्या विक्रीच्या रकमा व्यापाऱ्यांना बिनव्याजी वापरावयास मिळत. असे असूनही शेतकऱ्यांचे पैसे मुळातच बुडवले असे अनेकवेळा होईल.
गावातील शेती डबघाईला आलेली; सर्वसामान्य कुणब्यांची दुर्दशा तर विचारण्याची सोयच नाही. गावातील वतनदार मंडळी, काही सवर्ण कारभारी सावकारीचाही धंदा करीत आणि या सावकारवतनदारांचे अडत व्यापारात जबरदस्त वजन असे. त्यांच्या एका खुणेने एखादा कुणबी पार धूळदाणही होऊन जाई. शेतीमालाच्या विक्रीची ही व्यवस्था अंदाधुंदीची, बेबंदशाहीची पण जोपर्यंत शेतीला लागणारे बी-बियाणे, खतेमुते सर्व शेतातच तयार होई; जेव्हा शेतजमिनी भरपूर असल्याने दर तीनचार वर्षांनी जमिनीचा तिसरा चौथा हिस्सा मोकळा ठेवला जाई; अशा पड ठेवलेल्या जमिनीत नंतरच्या वर्षी वाढीव पीक येई तोपर्यंत बाजारपेठांच्या या जुलमाचा विक्राळ जाच शेतकऱ्यांना पुरेपूर जाणवत नसे.
बाजारपेठेत अशा तऱ्हेने नाडला जाणारा शेतकरी फार काळ तग धरून राहील हे शक्यच नव्हते. पाऊसपाणी ठीक झाले; चांगली पिके आली तर बाजारातील फटका क्षुल्लक वाटे आणि कुणबी त्याची फारशी फिकीर करत नसे.
एखाद्या वर्षी पावसाने डोळे वटारले, पिके बुडाली म्हणजे संकट आ वासून पुढे उभे राही. चांगल्या पावसाच्या वर्षी मुबलक पिकले पण त्यातून काहीच उरले नाही, मग दुष्काळ पडला की पोराबाळांसकट खडी फोडण्यास जाणे, देशोधडी लागणे, आपल्या लाडक्या जनावरांना चारापाण्यापासून तडफडत प्राण सोडताना पाहणे यापलीकडे काही गत्यंतरच नसे.
हिंदुस्थानात हजारो वर्षे सुखशांती नांदत होती, कशाची ददात नव्हती. अशा सुवर्ण कालखंडाचे वर्णन गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि इतर प्रचारक करत असतात. या सुवर्ण कालखंडातही दर दहा वर्षातून एकदातरी शेतकऱ्यांची दुष्काळाने दैना दैना होई. दिसायला कारण आसमानी – पाऊस पडला नाही, खरे कारण पाऊस पडला तेव्हा हाती काही आले नाही, त्यामुळे पावसाने डोळे वटारले की दैनाच दैना. पण ती सारी शेतकऱ्यांचीच. शेतीमालाच्या व्यापारात असलेला कुणी आडत्या, व्यापारी, दलाल दुष्काळ पडला म्हणून कधी निर्वासित झाला नाही, खडी फोडायच्या कामावर गेला नाही.