पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करीत; जमले तर माल घेऊन जात, नाही जमले तर शेतकरी दुसरा कोणी व्यापारी माल पाहण्यासाठी येईल अशी वाट पहात राही.
 डागाळलेला, मार खाल्लेला माल गावातच वापरायचा. किरकोळ विक्री बाजाराच्या दिवशी पेठेच्या गावात जाऊन करायची. जरा जांगड माल कोण्या खाजगी आडतीत लावायचा आणि कांदा, बटाटा, भुईमूग, तंबाखू, कापूस असा भारी माल घरात साठवून ठेवायचा आणि सौदा करेल त्या व्यापाऱ्याला द्यायचा अशी पद्धत वर्षानुवर्षे चालली.
 या पारंपरिक पद्धतीत दोष अनेक होते. पहिला दोष म्हणजे पिकलेला माल खराब होण्याआधी खात्रीने विकला जाईल आणि तो योग्य किंमतीने विकला जाईल याची काहीच शाश्वती नसे. बाजारपेठ सारी चिरफाळलेली होती. कोणत्याही मालाला एक निश्चित चालू भाव अशी गोष्टच नव्हती. प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाची किंमत वेगळी वेगळी ठरे. "माझ्या भुईमुगाला इतकाच भाव मिळाला, शेजारच्या शेतकऱ्याचा माल माझ्या मालासारखाच होता, पण त्याला किंमत जास्त मिळाली. हे असे का?" असे प्रश्न कोणाच्या मनात येत नसत. आले तरी सलत नसत आणि त्याबाबत आरडाओरडा होण्याची तर काही शक्यताच नसे.
 खाजगी आडतीत काय किंवा गावात आलेल्या व्यापाऱ्याशी केलेल्या व्यवहारात काय, मालाचे मोजमाप खरेखुरे होणे क्वचित. माल कमी भरावा यासाठी वापरण्याच्या शेकडो युक्त्या व्यापाऱ्यांना अवगत होत्या आणि ते त्यांचा सरसहा वापर करीत.
 विक्री करून मिळालेली किंमत आडते ज्या त्या मालदारास प्रामाणिकपणे पोचवतील ही गोष्ट दुर्मिळच. एकूण मिळालेली रक्कम आपल्या आडतीवर माल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना विभागून कशी द्यावी हे ठरवताना व्यापाऱ्यांच्या मनात शेतकऱ्याच्या व्यवहाराचा आकार, त्याच्याशी असलेले वैयक्तिक संबंध, शेतकऱ्याने घेतलेली उचल अशा अनेक गोष्टी असत.

शेतकऱ्याला किती रक्कम द्यायची त्याची पट्टी ठरली म्हणजे ती रक्कम शेतकऱ्यास तातडीने पोचेल असेही मुळीच नाही. शेतकरीही प्रत्येकवेळी पैसे तातडीने मागतातच असे नाही. पेरणी, खुरपणीच्या हंगामात त्यांना पैशाची गरज पडते. त्यावेळी ते पैसे मागायला येत. एरव्ही, वर्ष सहा महिने

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१४१