मुंबईच्या फुले (क्रॉफर्ड) मार्केटच्या आसपास लाल झुरझुरीत कागदात घासून पुसून चकचकीत करून ठेवलेल्या सफरचंदांची बाजारपेठ वेगळी. क्रॉफर्ड मार्केटच्या समोर टोपलीत रचून ठेवलेल्या सफरचंदांचे गिऱ्हाईक वेगळे. अशा उतरत्या श्रेणीने शेवटी चिंचपोकळीच्या पुलाखाली, लागलेल्या सफरचंदाचा किडका भाग कापून उरलेल्या चांगल्या भागाचे तुकडे तेथील गिऱ्हाईकांना विकण्याची दुकाने वेगळी. क्रॉफर्ड मार्केट ते चिंचपोकळीच्या दुकानातील किंमतीचा फरक पाचपाच पटीचा असतो.
शेतकऱ्यांच्या घरीही असाच काहीसा प्रकार होतो. लागलेला डागाळलेला माल चाकूने साफ करून शेतकरी मजुरांसाठी ठेवतो किंवा स्वत:च्या घरी ठेवतो. अखंड चांगले बटाटे शेताचा मालकसुद्धा खायला क्वचित वापरतो. कापून साफ केलेला मालसुद्धा खीस काढणे, साठवणीच्या वस्तू तयार करणे अशा कामांसाठी वापरतो. अगदी निवडक माल असेल तेवढाच बाजारात जातो.
बाजारात माल पाठवणे इतके सोपे नाही. कदाचित् एका काळी, डोक्यावर टोपली घेऊन शेतकऱ्यांच्या घरचेच कोणी बाजारपेठेच्या गावी जाऊन जमले तर एखाद्या झाडाच्या सावलीचा आधार बघून विकायला बसत असेल; माल जरा जास्त असला तर बैलगाडी लादून बाजारपेठेच्या गावी कोणी नेतही असतील. पण स्वत: विकायला घेऊन बसलेला माल खराब होण्याआधी विकला जाईलच याची खात्री नाही. किरकोळ गिऱ्हाईक रोख पैसे मोजून माल घेऊन जाते, पण त्याने भागत नाही. कोणा दलालाने माल मोठ्या प्रमाणावर उचलला तर तोही काही पैसे रोख देत नाही, माल उठावा या चिंतेपोटी अशा गिऱ्हाईकाला नाकारताही येत नाही. असे बड़े गिऱ्हाईक अनेकदा पैसे बुडवते.
जुनी खुली व्यवस्था
कांदा, बटाटा, भुईमूग हा कमी नाशवंत माल. या मालाच्या बाजारपेठेतील उलाढालही फार मोठी, त्यात व्यापाऱ्यांना फायदाही चांगला सुटतो. पूर्वी असा माल शेतकरी पिकेल तसा बाजारात पाठवत नसत. घरातील खोल्यात एखाद्या वखारीत तो काळजीपूर्वक सांभाळून ठेवत. व्यापारी किंवा त्यांचे दलाल गावोगावी जात, माल पहात, शेतकऱ्याशी किंमतीचा सौदा