पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३. गावगाड्याची व्यापार व्यवस्था

 हल्ली शेतकरी माल पिकवतो आणि तो कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत पाठवतो. किरकोळ उत्पादन करणारे, वाहतुकीचा फारसा खर्च परवडत नाही म्हणून जवळच्या बाजारपेठेत पाठवतात. मोठा माल उत्पादन करणारे मुंबई, पुणे, एवढेच नव्हे तर अगदी हैद्राबाद, बंगलोर, सूरत, बडोदा असा दुसऱ्या राज्यातही माल विक्रीसाठी पाठवतात. बाजारपेठेत पाठवलेला माल कोणा आडत्याच्या दुकानावर जातो. आडते आणि दलाल यांचेही काही विभाग असतात. कोणी भाजीपाल्यासारख्या नाशवंत मालाचाच व्यवहार करतात, कोणी फक्त फळांचाच; कोणी एखाददुसऱ्याच फळांच्या व्यापारात दलाली करतात. ज्वारी, बाजरी अशा भुसार मालाची आडत वेगळी; गुळासारख्या प्रक्रिया केलेल्या मालाला काही वेगळी व्यवस्था लागते, म्हणून त्यांचीही आडत म्हणून पुष्कळदा त्यांची सर्व बाजारपेठच वेगळी असते.
 शेतीमाल खरेदी करू इच्छिणारी व्यापारी मंडळी ठराविक वेळी येतात. प्रत्येक दलालाच्या दुकानात जातात, मालाची पहाणी करतात, किंमतींविषयी बोलणी करतात. पूर्वी ही बोलणी व्यापारी आणि दलाल यांच्यात हातावर रुमाल टाकून सांकेतिक खाणाखुणांनी होत असत; आता बहुधा, जमलेले व्यापारी लिलाव बोलून जास्तीत जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्याशी सौदा ठरतो.
 व्यापारी माल घेऊन जातात, ज्यांचा व्यवहार मोठा ते काही किरकोळ विक्रीची दुकाने चालवत नाहीत. ठोक व्यापारी मध्यस्थांना माल विकतात, मध्यस्थ दुसऱ्या मध्यस्थांना विकतात आणि शेवटी ग्राहक जेथे खरेदी करतो त्या किरकोळ दुकानापर्यंत भाजीपाला, फळफळावळ, भुसारमाल, गूळ, तंबाखू इ. शेतीमाल पोचतो.

 मध्यस्थांच्या लांबलचक रांगेचा एक परिणाम असा होतो की शेतमालाला मिळणारी किंमत व ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत यातील तफावत वाढत जाते. खेडेगावातील भणंग गरीबीत राहणारा शेतकरी मातीमोलाने माल विकतो, ग्राहक माल विकत घेतो ते त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे वेगवेगळ्या दुकानात.

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१३९