पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजवादाला प्राधान्य देण्याचा विजय झाला; आता स्वदेशीच्या नावाखाली तिसरा झेंडा घेऊन तंत्रज्ञानावर आपली मक्तेदारी स्थापन करण्याचा 'सवर्णां'चा प्रयत्न चालू आहे.
 अण्णासाहेबांनी त्यांच्या काळात त्या काळातील तंत्रज्ञानाला पाठिंबा दिला; आज आपल्यापुढे आलेल्या तंत्रज्ञानाची कास न धरता सवर्णांच्या तिसऱ्या विजयाची वाट मोकळी ठेवली तर इतिहासात आपण करटे शाबित होऊ. आपण जर आपले दरवाजे बंद करून खुल्या व्यवस्थेला दाराबाहेरच ठेवले तर आपल्या प्रगतीची काहीच शक्यता रहात नाही. जगाच्या इतिहासाची दिशा काय आहे? मी ब्राह्मणांना नावे ठेवली म्हणून तुम्ही नुसते खुष होऊन चालणार नाही. तुमच्या तुमच्या जातीतील कोणी जर 'ब्राह्मणी' वृत्तीने वागत असेल तर त्याचा धिक्कार करण्याची ताकद तुमच्यात नसेल तर तुम्हीही ब्राह्मणांइतकेच जातीयवादी ठरता. जगाच्या इतिहासामध्ये अनेकांनी धर्माची बंधने घातली, अनेकांनी आर्थिक बंधने घातली, भौगोलिक बंधने घातली. पण, सर्व भिंती पाडणे हा इतिहासाचा कल आहे, तो कोणाचाही मुलाहिजा न बाळगता किंवा दयामाया न ठेवता ज्या ज्या भिंती वाटेत येतील त्या पाडत जातो. तंत्रज्ञानाच्या विरोधाची भली मोठी भिंत आपल्यासमोर उभी केली जात आहे ती पाडण्यासाठी आपण इतिहासाला मदत करतो का नाही यातच आपली परीक्षा होणार आहे.

(माजी केंद्रीय कृषी मंत्री

कै. अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यान)

श्रीरामपूर, १२ जानेवारी २०००

१३८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने