खर्चिक आहे का स्वस्त हे आम्ही ठरवू; तुम्ही कोण सांगणारे दिल्लीला बसून.” अशी या प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे.
जागतिक व्यापार संघटनेच्या करारनाम्यामुळे हिंदुस्थानात साखरेची, कापसाची आयात होते आहे, कांद्याची निर्यात थांबली आहे हा प्रचार शुद्ध दिशाभूल करणारा आहे. या आयात-निर्यातीशी जागतिक व्यापार संघटनेचा काहीही संबंध नाही; हे सर्व खुल्या व्यवस्थेची केवळ तोंडदेखली भाषा करणाऱ्या सरकारी धोरणामुळे होते आहे. मी १० जानेवारी २००० रोजी जागतिक व्यापार संघटनेचे महानिदेशक माईक मूर यांना दिल्लीत भेटलो तेव्हा भारतातले शेतकरी खुल्या व्यवस्थेची मागणी करीत आहे हे ऐकून त्यांना सुखद आश्चर्य वाटले. हिंदुस्थानातील प्रत्येकजण खुल्या व्यवस्थेचा विरोधकच असेल असा त्यांचा ठाम समज आपल्याकडील बंदिस्त व्यवस्थेच्या समर्थकांच्या कारवायांमुळे झाला होता.
१९६५ साली जी परिस्थिती होती तीच परिस्थिती ३५ वर्षांनी आज २००० साली झालेली आहे. आणि आपण या नवीन तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या बाबतीत हरित क्रांतीच्या वेळेपेक्षाही अधिक बेसावध आहोत. आपल्याकडचे थोर थोर विचारवंत, थोरथोर साहित्यिक, थोरथोर पत्रकार हे नवीन तंत्रज्ञानाने येणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे परमेश्वराविरुद्धचा कट आहे, ते पाप आहे, मनुष्यप्राण्याने असल्या गोष्टी करण्याच्या फंदात पडू नये अशी हाकाटी करतात. बियाण्याचे गुण ईश्वराने तयार केले, त्यात तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न करता म्हणजे तुम्ही जगबुड आणणारे आहात असा दोषारोप ही मडळी शास्त्रज्ञांवर आणि त्यांच्या प्रयोगांना मान्यता देणारांवर करतात. याच मंडळींनी, हिंदुस्थानात पहिल्यांदा आगगाडी आली तेव्हा विरोध केला. रासायनिक खते आणि औषधे यांनाही याच लोकांनी विरोध केला. नवीन कोणतीही गोष्ट आली की त्याला विरोध करण्याची ही वृत्ती म्हणजे ज्ञानाला संकुचित करणारी 'ब्राह्मणी' वृत्ती आहे. 'ज्ञानाचे दरवाजे उघडा, सर्व लोकांना त्याचा अनुभव घेऊ द्या, प्रयोग करू द्या' असे म्हणण्याऐवजी 'ज्ञान ज्ञान म्हणून जे काही आहे त्याचे आम्ही मक्तेदार आहोत, ते आमच्या खेरीज दुसऱ्या कोणाला मिळू नये' अशा प्रवृत्तीच्या लोकांचा तिसऱ्यांदा विजय होतो आहे. पहिल्यांदा राजकीय स्वातंत्र्याला प्राधान्य देण्याचा विजय, दुसऱ्यांदा