पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले आहे. तसे झाले नसते तर माल्थसच्या सिद्धांतानुसार जगभर भूकमरी सुरू झाली असती. माल्थसने सांगितले होते की, “लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते आणि अन्नधान्याचे उत्पादन गणित श्रेणीने वाढते, त्यामुळे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा होऊन लोक भुकेने मरतील.” पण तसे घडलेले नाही. उलट, माल्थसच्या काळापेक्षा आज आपण जास्त आणि जास्त चांगले अन्न खातो आहोत. हे तंत्रज्ञानाने शक्य झाले. कारण, जमिनीची व्याख्या माणसाने तंत्रज्ञान आणून बदलवली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीची प्रक्रिया ही काही हरित क्रांतीपाशी थांबलेली नाही. हरित क्रांतीने भुकेचा प्रश्न सोडवला पण दोन नवीन प्रश्न तयार केले आणि या प्रश्नांचे निराकरण इतिहासामध्ये मागे जाऊन होणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे उडी मारून होणार आहे.
 नवीन येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचे स्वरूप कसे आहे? यापुढे किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला औषधांचा उपयोग करण्याची फारशी गरज पडणार नाही. शास्त्रज्ञांनी बियाण्यांच्या जनुकांमध्ये (Genes) बदल करून अशा तऱ्हेचे वाण तयार करण्यात यश मिळविले आहे की ज्या वाणाला अमुक अमुक किडीचा त्रास होणारच नाही. इतकेच नव्हे तर त्याची उत्पादनक्षमता प्रचंड गतीने वाढेल, एवढेच नव्हे तर आपल्याला हवे असलेलेच गुणधर्म असलेले वाणसुद्धा जनुक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करता येतील. उदाहरणार्थ, मधुमेही माणसांनी खाल्ली तरी त्याला त्रास होणार नाही अशी साखर ज्यातून मिळू शकेल असे उसाचे वाणसुद्धा तयार करता येऊ शकेल. औषधे वापरावी न लागता किडीचा बंदोबस्त होईल, उत्पादन वाढेल, हवे तेच गुणधर्म असतील, नको असलेले गुणधर्म नसतील अशा प्रकारचे वाण तयार करणे आता जनुक तंत्रज्ञानाने शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एका मेंढीसारखी दुसरी मेंढी शास्त्रज्ञ करू शकतात, मनुष्यप्राणीसुद्धा तयार करू शकतात.

 क्षितिजावर एक नवीन तंत्रज्ञान येते आहे. पण १९६५ साली हिंदुस्थान सरकार हरित क्रांतीला सामोरे जाण्याबाबतीत जितके बेसावध, गाफील होते तितकेच आजचे सरकार नवीन ‘जनुक क्रांती (Gene Revolution)' करिता बेसावध आणि गाफील आहे. मी माझा हा निष्कर्ष ५ जानेवारी रोजी दिल्लीला वित्तमंत्र्यांनी अंदाजपत्रकपूर्व चर्चेसाठी जी बैठक बोलाविली होती त्यात

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१३५