'महात्मे'ही खूप पुढे आले.
पर्यावरणवाद्यांनी म्हटले की आपल्याला प्रदूषण करणारी ही रासायनिक शेती नकोच. आपण जैविक शेतीकडे वळू या. रासायनिक औषधांच्याऐवजी कडुलिंबाचा रस फवारा, आणि रासायनिक खतांच्या ऐवजी गायीचे किंवा म्हशीचे शेण वापरा. त्यांच्यापैकी काहींचे म्हणणे असे होते की गायीचे शेणखत हे जास्त उपयोगाचे असते आणि म्हशीचे शेणखत कमी उपयोगाचे असते. एवढाच त्यांच्यात वादाचा मुद्दा राहिला. यामुळे ते 'महात्मे' संबोधनास पात्र ठरतात.
जैविक शेतीने जर प्रश्न सुटणार असते तर शेतीमध्ये सुधार घडविण्यासाठी अण्णासाहेब शिंद्यांची गरज नव्हती, सी. सुब्रह्मण्यमची गरज नव्हती आणि हरित क्रांतीचीही गरज नव्हती. कारण, गेली दोन हजार वर्षे हिंदुस्थानात जैविक शेतीच चालू होती. पण तरीही दर दहा वर्षांनी दुष्काळ पडून लाखो माणसे मरत होती. तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने प्रगती होत असताना जैविक शेतीकडे वळणे म्हणजे इतिहासामध्ये मागे जाण्यासारखे आहे. पण, इतिहासामध्ये मागे जाऊन कोणत्याही समाजाचे किंवा राष्ट-ाचे प्रश्न सुटत नाहीत.
१९६५ साली झालेल्या हरित क्रांतीने अन्नधान्याची मुबलकता तयार झाली. त्याबरोबरीनेच पर्यावरणाचा प्रश्न तयार झाला आणि किंमतीचा म्हणजे आर्थिक प्रश्नही तयार झाला हे आपण पाहिले. 'महात्मे' कितीही 'जैविक' शेतीचा, इतिहासात मागे जाणारा उतारा या समस्यांवर सांगोत, जागतिक तंत्रज्ञान या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पुढे चालले आहे.
हरित क्रांतीच्या काळात आलेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या स्वीकाराबाबत आम्ही जितके गाफील, बेसावध होतो तितके आज येऊ घातलेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीतही गाफील आणि बेसावध आहोत. अण्णासाहेब शिंद्यांसारख्या ज्या थोड्यांनी त्याकाळी हरित क्रांतीचे तंत्रज्ञान आपलेसे करण्यात जी धडाडी दाखविली ती या नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्यात आहे किंवा नाही हे येत्या दोन वर्षात आपल्याला सिद्ध करावे लागणार आहे. त्या काळी हरित क्रांती झाली. आता त्याच्या पुढची नवीन तांत्रिक क्रांती येते आहे. प्रत्येक वेळी तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळेच माणसाला अन्न मिळणे शक्य