पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किंवा नाही याचा ते विचार करतात. म्हणजे शेती करणे फायद्याचे ठरले तर ते उत्पादन वाढविण्याचे सर्वात मोठे साधन ठरते; तंत्रज्ञान पुरविणे आणि संरचना पुरवणे ही उत्पादनवाढीची साधने होऊ शकत नाहीत.
 तंत्रज्ञान, संरचना आणि किंमत या उत्पादनवाढीच्या साधनांची क्रमवारी करताना प्रथम क्रमांकावर असावयास हवी ती किंमत सर्वांशाने दुर्लक्षित करण्याचे मोठे दुष्परिणाम झाले. उदाहरणार्थ, अहमदनगर जिल्ह्यात सहकारी व्यवस्था चांगली मोठी झाली, मोठमोठे दिग्गज, टनाटनाचे नेते तयार झाले. पण, शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र अधिकच बिकट झाली. सगळ्यात जास्त सहकारी साखर कारखाने इथे आणि सगळ्यात कर्जात बुडणारे शेतकरीही इथलेच अशी या जिल्ह्यात परिस्थिती, तंत्रज्ञान आणि संरचना पुरविणाऱ्या हरित क्रांतीनंतर, तयार झाली. सहकाराच्या माध्यमातून अण्णासाहेब शिंदे यांनी नगर जिल्ह्यात एक व्यवस्था तयार केली, पूर्वी लोक उपाशी रहात असत आता त्यांना खायला मिळेल इतकी परिस्थिती तयार झाली. पण मागणीइतका पुरवठा झाल्यानंतर किंमती घसरू लागल्या आणि उत्पादन कमी होऊ लागले आणि किंमती-उत्पादनाचे हे चक्र सुरू झाले आणि दर तीन वर्षांनी उसाचे उत्पादन नाहीसे होऊ लागले.
 हा दुष्परिणाम टाळण्यासाठी, किंमत अग्रभागी ठेवण्याच्या मुद्द्यावर शेतकरी चळवळ उभी राहिली ती शेतकऱ्याच्या सामूहिक बुद्धीचा आविष्कार आहे. म्हणजे, आम्ही अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढची पायरी घेतली. त्यांनी आधीच्या पायऱ्या घेतल्या नसत्या तर शेतकरी संघटना उभी रहाणे इतके सरळपणे झाले नसते.

 शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे आणखी एक समस्या तयार झाली. अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांमध्ये एक दोष होता. पाणी दिले, खते दिली, औषधे दिली तर उत्पादन अधिक गतीने वाढते हा या वाणाचा गुण आहे. पारंपरिक बियाण्यांच्या बाबतीत हे घडत नाही. नवीन वाणांमुळे, मग, रासायनिक खते आणि औषधे यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. पर्यावरणवाद्यांनी हाकाटी सुरू केली की रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या वापरामुळे पाणी प्रदूषित होत आहे, जमीन प्रदूषित होत आहे, वगैरे वगैरे. त्यावर त्यांनी एक मार्ग सुचवला आणि त्या मार्गावर निष्ठा ठेवणारे

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१३३