पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योजनेवर झा कमिटीने दिलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की दुधाच्या उत्पादनामधील सर्वांत जास्त वाढ गुजरातमध्ये नाही झाली, उलट गुजरातमधील वाढ सगळ्यात कमी आहे; सगळ्या जास्त वाढ महाराष्ट-ात झाली आणि तीसुद्धा कोल्हापूर आणि जळगाव हे दूध महापूर योजनेचे दोन जिल्हे सोडून. शेतकरी संघटनेने केलेल्या दूध आंदोलनामुळे, दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर दूध उत्पादन करणाऱ्या माणसाला त्याच्या कष्टाचे आणि गुंतवणुकीचे काहीतरी फळ मिळायला पाहिजे ही कल्पना महाराष्ट-ात पहिल्यांदा मान्य झाली आणि म्हणून महाराष्ट-ात दूध उत्पादन वाढले. महाराष्ट-ातले दूध जमशेटपूरला आणि कलकत्त्याला जाते, दूध महापूर योजनेच्या गुजरातचे नाही.
 तेव्हा, उत्पादकतेत बदल घडतो तो कशामुळे घडतो हे नीट समजावून घेतले पाहिजे. समजा, एखाद्या बँकेच्या मॅनेजरसमोर एक कारखानदार आला आणि त्याच्यासमोर एक वस्तू ठेवून म्हणाला की, 'मी ही फार सुंदर वस्तू तयार केली आहे. त्याचे मला उत्पादन करायचे आहे त्यासाठी कर्ज हवे आहे.' तर बँक मॅनेजर त्याला पहिला प्रश्न विचारील की, "ही वस्तू कितीही सुंदर असो, तिला बाजारात मागणी आहे का? ती वस्तू बनवायला जो खर्च येईल तो भरून निघेल अशी किंमत द्यायला कोणी तयार होईल का?" उद्योगधंद्याच्या बाबतीत जर तुम्ही असे मानता की कारखानदारांना फायदा होतो किंवा नाही हे समजण्याची अक्कल आहे तर मग, शेतकऱ्यांना इतकी अक्कल नाही असे गृहीत का धरता? डाव्या विचारवंतांच्या आणि डाव्या अर्थशास्त्र्यांच्या पुस्तकात असे कित्येक उल्लेख सापडतात की, 'शेतकरी, किंमत वर जावो का खाली पडो, उत्पादनाचे निर्णय बदलत नाही. त्याच्या शेतामध्ये जितके काही उत्पादन होणे शक्य आहे तितके उत्पादन तो (गाढवासारखे) काढीत राहतो.'

 अनेक भागात शेतकऱ्यांनी आता दूध उत्पादन सोडून दिले आहे, उसाचे शेतकरीही ऊस सोडून देऊन कांद्याचे उत्पादन घेऊ लागले आहेत. ज्याच्यात जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे ते उत्पादन शेतकरी घेतात. कारण उघड आहे. शेतकरीसुद्धा माणसे आहेत, बुद्धी असलेली माणसे आहेत आणि आपला सर्व खटाटोप 'अंततो गत्वा' काही फायद्याचा होणार आहे

१३२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने