Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरकारने धरणे बांधली नाहीत तरी शेतकरी ती बांधतील; तंत्रज्ञानसुद्धा ते आणतील. खरे म्हणजे, सरकार तंत्रज्ञान आणतच नाही. जे तंत्रज्ञान देशामध्ये आपोआप आले असते ते तंत्रज्ञान येऊ नये याकरिता स्वातंत्र्यानंतरच्या सर्व सरकारांनी प्रयत्न केला. जोतिबा फुल्यांनी म्हटले होते की बाहेरच्या जगाशी संपर्क आला की बहुजन समाजाचे आपोआप कल्याण होणार आहे. पण, बहुजन समाजाचा बाहेरच्या जगाशी संपर्क होऊ नये असा खटाटोप समाजवादाच्या नावाखाली केला गेला.
 राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ आणि त्यानंतर समाजवाद या दोन नावाखाली बहुजन समाजाला फसवले गेले आहे हे लक्षात आल्यानंतर साधारणपणे १९६५ च्या सुमारास अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या माणसांनी त्यांच्या मूळच्या आर्थिक व्यवसायाकडे - शेतीव्यवसायाकडे तज्ज्ञ शेतकऱ्याच्या नजरेने पाहून शेतीच्या विकासासाठी काय करायला पाहिजे याचा विचार सुरू केला आणि त्यातूनच हरित क्रांतीचा प्रयोग साकारू लागला. हरित क्रांतीचे संपूर्ण श्रेय कोणा व्यक्तीला देणे योग्य होणार नाही कारण असे काम काही एकट्यादुकट्याने होणारे नसते. हरित क्रांती त्या काळात यशस्वीही झाली. पण, इतिहासाचाही एक कल असतो. आपण एखादी सुधारणा करतो. पण एक सुधारणा केली म्हणजे जगातील सर्व समस्या सुटतील असा एक कलमी कार्यक्रम कोणताही नसतो. आपण एक सुधारणा केली की त्याबरोबरच काही नवे दोष तयार होतात. हे दोष दूर करण्याकरिता आणखी नवीन सुधारणा कराव्या लागतात आणि त्यातून आणखी नवीन दोष तयार होतात. 'शेतकरी संघटनेचे नैतिक दर्शन' (१९८४) या माझ्या लेखात मी म्हटले आहे की, 'समाज निर्दोष व्यवस्थेला कधी पोहोचतच नाही; समाज एका दोषास्पद अवस्थेतून दुसऱ्या दोषास्पद अवस्थेत जात असतो.'

 १९६५ साली हरित क्रांती झाल्यानंतर उत्पादन वाढले, यात काही शंका नाही. जहाजातून आलेल्या अन्नावर गुजराण करण्याची परिस्थिती संपली. दहा वर्षांत अन्नधान्याचे उत्पादन तिप्पट झाले, दुधाचेही उत्पादन वाढायला लागले. ही वाढ होण्यासाठी नेमका परिणाम कशाचा झाला याविषयी थोडा गोंधळ आहे. आम्ही तंत्रज्ञान दिले, बियाणे आणले, खतांचे कारखाने काढले म्हणून हे उत्पादन वाढले असे जे म्हटले जाते ते चुकीचे

१३०
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने