पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्घोष सुरू केला. विकास व्हायचा असेल तर तो समाजवादानेच होईल, सर्वसामान्य शेतकरी, उद्योजक, कारखानदार यांच्यात निर्णय करण्याचं ताकदच नाही, ते देश सुधारू शकत नाहीत; देशाला प्रगतीच्या मार्गावर न्यायचे तर ते दिल्लीचे 'नियोजन मंडळ'च करू शकेल. हा झाला नेहरूचा समाजवाद. जयप्रकाश नारायण आणि लोहिया यांच्या समाजवादाची व्याख्या थोडी वेगळी होती. 'कसणाऱ्यांची जमीन आणि श्रमणाऱ्यांची गिरणी' अशी त्यांची व्याख्या होती. त्यांच्याऐवजी पंडित नेहरूचा समाजवाद ‘सर्व जमीन, सर्व कारखाने सरकारचे; संपत्तीचे राष्ट-ीयीकरण करावे' असा सोव्हिएट तोंडवळ्याचा.
 म्हणजे, बहुजन समाजाचा पहिल्यांदा पराभव झाला तो राजकीय स्वातंत्र्य मागणाऱ्या सवर्णांनी केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजवादाच्या नावाखाली राष्ट्रीयीकरण पुढे आले आणि बहुजन समाजाच्या थोर थोर नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला. या समाजवादाचा खरा अर्थ काय होता?
 नागपूरला एक विद्वान कम्युनिस्ट गृहस्थ होते; त्यांना नागपूरचे माओ त्से तुंग म्हणत. १९८० साली मी त्यांनाही भेटलो होतो. त्यांनी माझ्यावर खूप टीका केली. ते म्हणाले, “तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही शेतकऱ्यांचे काम करता आहात हे मानणे शक्यच नाही, कारण ब्राह्मणांनीच शेतकऱ्यांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय केला आहे.” मी म्हटले, “हे अगदी खरे आहे की ब्राह्मणांनी शेतकऱ्यांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय केला आहे. पण, याचा अर्थ असा नव्हे की मला जे सत्य दिसलं ते मी शेतकऱ्यांपुढे मांडू नये. मी त्यांच्यापुढे मांडीन, त्यांना पटलं तर घेतील."
 मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की, “तुम्ही राष्टीयीकरणाला विरोध का करता?"
 मी त्यांना उत्तर दिले की, “तुमची विचारसरणी मला काही समजत नाही. एक ब्राह्मण म्हणून तुम्ही माझा निषेध केलात. पण 'राष्ट-ीयीकरण' याचा खरा अर्थ 'ब्राह्मणीकरणच' आहे.”

 कारण, या समाजवादात जे निर्णय शेतकऱ्यांनी करायचे किंवा उद्योजकांनी करायचे किंवा कारखानदारांनी करायचे आहेत ते त्यांनी न करता दिल्लीला किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या राजधान्यांतल्या नोकरशहांनी करायचे

१२८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने