पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमची मागची देणीघेणी आम्ही पाहून घेऊ. इंग्रजांनी जेव्हा संमतीवयाच्या कायद्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी लोकमान्य टिळकांसारखा नेता म्हणाला की, 'म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतो. इंग्रजाला आमच्या समाजव्यवस्थेमध्ये हात घालू द्यायला आम्ही तयार नाही.'
 दुर्दैवाची गोष्ट अशी की जोतिबा फुले, आगरकर यांचा म्हणजे 'प्रथमतः एकमय लोक याअर्थी राष्ट- तयार करा.' असे म्हणणाऱ्या लोकांचा पराभव झाला. जोतिबा फुल्यांचा पराभव झाला, बहुजन समाजाचा पराभव झाला आणि काँग्रेसवाल्यांचा म्हणजे 'आधी राजकीय स्वातंत्र्य मिळायला हवे' असे म्हणणारांचा जय झाला. शिक्षणाची आस धरणाऱ्या बहुजन समाजाचा पराभव होऊन ज्यांना आयसीएस मध्ये जागा हव्या होत्या, इंग्रज जावे आणि त्यांच्या खुर्च्या आपल्याला मिळाव्या अशी ज्यांची कामना होती त्या लोकांची ताकद वाढली. बहुजन समाजाच्या मनामध्ये या लोकांविषयी संशय होता. वर्षातून एकदा टायबूट घालून मुंबईला काँग्रेसमध्ये जमणारी ही मंडळी आपली आहेत असे काही त्यांना वाटत नव्हते. पण, महात्मा गांधी आले आणि त्यांनी दलितांच्या उद्धाराचा ग्रामीण अर्थशास्त्राचा विचार मांडला आणि बहुजन समाजाने राष्टीय चळवळीला विरोध करायचे सोडून दिले. काही लोक त्याच्या जवळही गेले. पण, बहुजनांचा पहिला पराभव आणि सवर्णांचा विजय झाला आणि सामाजिक सुधारणांचा विचार बाजूला पडून राजकीय स्वातंत्र्याला अग्रक्रम देणारा विचार यशस्वी झाला. बहुजन समाज काँग्रेसबरोबर गेला नाही, दूर राहिला. पण नंतर, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ जसजशी वाढू लागली तसतसे बहुजन समाजाचे लोकही त्या प्रवाहात सामील होऊ लागले. महाराष्ट-ापुरता विचार करावयाचा झाल्यास, खानदेशामध्ये फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेसमध्ये पहिल्यांदा हा बहुजन समाजाचा प्रवाह काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि तो शेवटपर्यंत मिसळून राहिला.

 स्वातंत्र्य आले आणि जोतिबा फुल्यांचे भाकित खरे ठरले. 'पेशवाई' आली. गांधींना नेता, महात्मा मानणाऱ्या काँग्रेसने पंडित नेहरूच्या हाती सत्ता आल्याबरोबर गांधीजींनी ज्याचे कधी नावही घेतले नव्हते त्या समाजवादाचा

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१२७