Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राज्यकर्त्यांच्या दृष्टीने 'ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट, तरी तो तिन्हीं लोकी श्रेष्ठ' असली काही भावना नाही याबद्दल आनंद आणि समाधान वाटत होते.
 काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा जोतिबा फुले म्हणाले की, "तुम्ही 'न्याशनल' काँग्रेस म्हणता पण 'नेशन कुठे आहे? नेशन म्हणजे 'एकमय लोक'. तुमचा सबंध देश जातिव्यवस्थेने फुटून फुटून गेलेला आहे. 'राष्ट्र'च नाही तर तुम्ही 'राष्ट-ीय काँग्रेस' कुठून म्हणता? आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याची मागणी कसली करता?" जोतिबा फुल्यानी दाखविलेला दूरदर्शीपणा लक्षात घेतला म्हणजे अण्णासाहेबांचे महत्त्व कळेल. जोतिबा म्हणाले की, 'जर का सामाजिक अन्याय दूर न होताच' इंग्रज येथून निघून गेले आणि तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर इथे पुन्हा 'पेशवाई' स्थापन होईल. त्या काळात वादविवाद झाले. आगरकर आणि टिळक यांच्यात वादविवाद झाले. आगरकरांनी मांडले की, 'ज्या देशामध्ये स्त्रियांना माणूस म्हणून मानले जात नाही तेथे स्वातंत्र्याची कसली मागणी करता? स्वातंत्र्य काय फक्त पुरुषांकरिता घ्यायचे आहे?' अशा तऱ्हेने या देशातील जे जे पीडित, शोषित होते, हजारो वर्षांच्या वर्णाश्रमधर्मामध्ये पीडले गेलेले होते त्यांची भावना अशी होती की, 'इंग्रजांचे राज आल्यामुळे श्वास मोकळे झाले. आता जिवंत माणूस म्हणून जगण्याची थोडीतरी संधी मिळणार आहे.'

 म. फुल्यांनी स्वातंत्र्य मागितले नाही, त्यांनी व्हिक्टोरिया राणीला म्हटले, 'आम्ही मुले अज्ञानी आहोत, फक्त आमच्या शिकण्याची व्यवस्था करा.' पण, आम्ही शिक्षण महत्त्वाचे मानले नाही कारण त्यावेळी दुसरा एक घटक हिंदुस्थानात असा होता की ज्याला राजकीय स्वातंत्र्याची फार घाई झाली होती. या मंडळींच्या हातून राजकीय सत्ता नुकतीच गेली होती. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले की, 'आमच्या हातून राज्य गेले, आम्ही गुलाम झालो हा काही आमच्या संस्कृतीचा दोष नाही. आम्ही इंग्रजापेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी नाही. आमचे वाङ्मय तितकेच श्रेष्ठ, संस्कृती तितकीच श्रेष्ठ, काव्य तितकेच श्रेष्ठ, तत्त्वज्ञान त्यांच्यापेक्षा दोन बोटे अधिक श्रेष्ठ. पण आम्ही गुलाम झालो याचे कारण इतिहासामध्ये रहाटगाडग्याचा नियम असतो. 'चक्रनेमीक्रमा'ने आम्ही आज खाली आलो, उद्या आपोआप आम्ही वर जाणार आहोत' त्यामुळे पहिल्यांदा इंग्रजांना काढून लावा मग

१२६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने