पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अण्णासाहेबांच्या प्रेमी मंडळींनाही त्यांनी अण्णासाहेबांना पूर्णपणे जाणलेले नाही हे कबूल करावे लागेल. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट या अर्थशास्त्रविषयक संस्थेच्या ग्रंथालयात सी. सुब्रह्मण्यम् यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे अर्धे कपाट आहे. तिथे पंजाबराव देशमुखांचे समग्र साहित्य उपलब्ध आहे. अण्णासाहेबांचे साहित्य काय आहे ते मला सविता भावेंच्या पुस्तकात अवतरणांच्या स्वरूपात सापडले. ते सोडल्यास अण्णासाहेबांनी शेतीप्रश्नासंबंधी केलेली समग्र मांडणी काही मला कोणत्या ग्रंथालयात सापडली नाही. तेव्हा, अण्णासाहेबांचे या विषयावर जे काही लिखाण आहे ते आणि त्यांची भाषणे एकत्र समग्र ग्रंथाच्या रूपाने संकलित करण्याचे काम त्यांच्या प्रेमी मंडळींनी करावे अशी माझी सूचना आहे.
 सबंध स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये काय काय घडले याचा आढावा मी घेतो.
 बहुतेक लोकांच्या मनात कल्पना असते की इंग्रज आले, इंग्रजांनी हिंदुस्थानचे शोषण केले, त्याच्या विरोधात काँग्रेसची स्थापना झाली, त्यांनी थोडीशी चळवळ केली, मग महात्मा गांधी आले, त्यांनी जनआंदोलन केले, अहिंसेचे हत्यार दिले, सत्याग्रहाचे हत्यार दिले आणि इंग्रजांना येथून जावे लागले. रामायण जसे चार वाक्यात सांगावे तसा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अशा चार वाक्यात बहुतेकांच्यासमोर येतो. मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की हा इतिहास खोटा आहे.

 इंग्रज आल्यानंतर काय घडले? इंग्रज आल्यानंतर, जातिव्यवस्थेने फोडल्या गेलेल्या या समाजातील तळागाळातल्या लोकांना तरी इंग्रज आले यामुळे फार दुःख झाले नाही. मी हे काही वेगळे मांडत नाही. मुसलमान आक्रमकांच्या बाबतीत जोतिबा फुल्यांनी म्हटले आहे की, त्याकाळचे हिंदु राजे गरीब हिंदु रयतेला इतके पीडीत की "महम्मदाचे जवाँमर्द शिष्य" आल्यावर येथील शेतकऱ्यांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. तसेच, येथील तळागाळातल्या माणसांना - ज्यांना शिक्षणाची संधी नव्हती, शाळेत जाता येत नव्हते, व्यापारउदिमाची संधी नव्हती त्यांना – 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या काळातसुद्धा सरकार शाळा काढते आहे आणि त्यात ब्राह्मणब्राह्मणेतर असा भेदाभेद न करता सर्व लोकांना घेतले जाते, नोकरीत घेतले जाते आणि निदान

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१२५