पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्से तुंग मांडतो. एकदा मनुष्य सुखवस्तु झाला की तो रस्त्यावर बसायला फारसा तयार होत नाही; झालाच तर नऊ दिवस, पुढे नाही. नंतर पसार. त्याप्रमाणे, आपल्या मालाला बरा भाव मिळू लागला, उसाला बऱ्यापैकी भाव मिळू लागला, कापसाला बऱ्यापैकी भाव मिळू लागला, कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळू लागला की मग रस्त्यावर कोण जाऊन बसेल, तुरुंगात कोण जाऊन बसेल अशी साहजिकच भावना तयार होते. संपन्नता आणि क्रांतिप्रवणता यांचा विरोध आहे. आणि ज्या प्रमाणात शेतकरी आंदोलनाने शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आणून दिली त्या प्रमाणात क्रांतिप्रवणता संपुष्टात आली आणि शरद जोशी Spent Force झाला ही गोष्ट खरी आहे.
 स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा तयार झाला. अमेरिकेतून गहू आणावा पण हिंदुस्थानातील शेतकऱ्याला मात्र उत्पादन वाढवायला उत्तेजन देऊ नये असे तत्त्वज्ञान अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. जुने समाजवादी अशोक मेहता यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, "अमेरिकेतून जहाजांनी आणलेला गहू इतका स्वस्त पडत असेल तर आपण हिंदुस्थानच्या शेतीकडे काही काळ दुर्लक्ष केले तरी चालेल."

 १९६५ साली यात बदल घडला. हा बदल नेहरू घराण्याने घडवला नाही, लाल बहादूर शास्त्रींनी घडवला हे मुद्दाम सांगायला हवे. कारण नेहरू घराण्याने शेतीकडे कधी लक्ष दिले नाही. लाल बहादूर शास्त्री आले, त्यांनी सी. सुब्रह्मण्यम यांना शेतीमंत्री केले. सी. सुब्रह्मण्यम यांनी आपल्या एक पुस्तकात सुरुवातीलाच लिहिले आहे की, 'मी आधी उद्योगधंद्याचा मंत्री होतो, नंतर शेतीमंत्री झालो. शेतीमंत्री झाल्यावर माझ्या लक्षात पहिली गोष्ट आली की हिंदुस्थानातील शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे, तोट्याचा धंदा आहे; त्यातून दोन पैसेसुद्धा सुटत नाहीत' आणि त्याचे कारण ‘सरकारचे शेतीमालाच्या भावासंबंधीचे धोरण शेतकरीविरोधी आहे.' हे आहे. ही १९६५ साली दिलेली शेतीच्या लुटीची कबुली. त्यानंतर लाल बहादुर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली हरित क्रांतीला आणि धवल क्रांतीला सुरुवात झाली. याचे श्रेय शास्त्रीजींच्या बरोबरीने सी. सुब्रह्मण्यम्, अण्णासाहेब शिंदे यांच्याकडेही जाते. नेहरूनी नागपूरच्या अधिवेशनात शेतीच्या राष्ट्रीयीकरणाची अभद्र कल्पना मांडली. तिला कडाडून विरोध करणाऱ्या पंजाबराव देशमुख आणि चरणसिंग

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१२३