ज्यावेळी समाजवादाचा उदो उदो होत होता त्यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने मी भूमिका घेतली की सामूहिक निर्णयप्रक्रिया ही कधीही शास्त्रीय असू शकत नाही. दिल्लीला बसून जर कोणी ठरवू पाहील की मी किती धान्य उगवायचे आणि किती पिकवायचे, आणि त्याकरिता कोणती खते वापरायची आणि कोणती औषधे वापरायची तर तो निर्णय चुकीचाच असेल, तो बरोबर असूच शकत नाही. जर निर्णयाची प्रक्रिया शेताच्या पातळीवर झाली, कारखान्याच्या पातळीवर झाली तर निर्णय योग्य होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या मनात 'स्वत:चं भलं व्हावं' अशी एक प्रेरणा असते. त्या प्रेरणेचा पाठलाग करता करता तो केवळ स्वत:चाच नव्हे, स्वत:च्या कुटुंबाचाच नव्हे तर सबंध समाजाचा आणि राष्ट-चा उद्धार साधून जातो. पण, 'मी राष्ट-चा उद्धार करतो आहे, जे काही आहे ते मला समजले आहे आणि मला जे समजले आहे ते सर्वसामान्यांना समजण्याच्या पलीकडे आहे; तेव्हा, लोकहो, तुम्ही माझे ऐका' असे म्हणणारे जे धार्मिक, पंडित निघाले त्यांनी सबंध समाजाला धोका दिला. आणि अशा तऱ्हेची भाषा वापरणाऱ्या समाजवाद्यांचादेखील इतिहासाने पराभव केला. शेतकरी संघटना चालू झाली तेव्हा समाजवादाच्या पाडावाचे भाकित केल्यावर सगळे म्हणायचे, 'हा काय मूर्खपणा आहे, समाजवाद हे उद्याचे भविष्य आहे!' पण, दहा वर्षांच्या कालावधीत संपूर्ण जगभर समाजवादाचा पाडाव झाला; तेनसिंगने एव्हरेस्ट गाठले आणि तो Spent Force झाला.
१९८९ साली व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना मी कॅबिनेट दर्जाच्या 'कृषी सल्लागार समिती'चा अध्यक्ष होतो. मिळालेल्या अपुऱ्या कार्यकालामध्ये इतर काही नाही तरी शेतीमालाचा उत्पादनखर्च काढण्याच्या पद्धतीत काही बदल केले. त्या बदलांमुळे मोठा फरक पडला. १९९१ नंतर शेतीमालाच्या भावांच्या वाढीची गती बिगरशेतीमालांच्या भावांच्या वाढीच्या गतीपेक्षा पहिल्यांदाच जास्त झाली. हे आकडेवारीतून तपासता येईल. त्याच्या आधी कापसाचा भाव क्विंटलमागे ५ किंवा १० रुपयांनी वाढायचा. त्यावर्षी क्विंटलमागे ९० रुपयांनी जी वाढ झाली ती आमच्या समितीने उत्पादनखर्च काढण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलांमुळे झाली. 'हातामध्ये पैसे आले तरीसुद्धा लोक क्रांती करीत राहतात' अशा तऱ्हेचा विचित्र विचार फक्त माओ