पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अणुंच्या आतषबाजीची किंमत
 एका बाजूला अर्थमंत्री, व्यापारमंत्री जगभरचे दौरे करतात, परदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानात धन ओतावे, तंत्रज्ञान आणावे म्हणून विनवणी करीत फिरतात; पावसाने थोडे डोळे वटारले तर दक्षिणोत्तर चारपाचशे शेतकऱ्यांना विष पिऊन जीव देण्याखेरीज पर्याय राहात नाही. अशा देशाने, दुसऱ्या बाजूला अणुक्षेत्रातील आपली मस्ती दाखविण्यापूर्वी काही विवेक केला पाहिजे. प्रमुख श्रीमंत देशांच्या उच्छिष्टावर पिंड पोसलेल्या दरिद्री देशांच्या यादीतील हा भणंग देश, विज्ञानाच्या क्षेत्रात उगाचच काही आंग्लविद्याविभूषित संशोधनतस्करांचे अहंकार गोंजारण्यासाठी मिशीला तूप लावून फिरतो हा जागतिक कुतुहलाचा किंवा करमणुकीचा विषय राहिला आहे. पण, या माकडचेष्टा प्राणघातक मर्यादा ओलांडून पलीकडे जाऊ लागल्या तर जग त्याची गांभीर्याने दखल घेईल, आवश्यक तर बडगा दाखवेल हे सहज समजण्यासारखे आहे.
 पाच अणुस्फोट घडवल्यानंतर जगातील प्रबळ राष्ट-ांनी भारताविरुद्ध आर्थिक कार्यवाही केली तर त्याबद्दल तक्रार करण्यास हिंदुस्थानला जागा नाही. इराकचा सद्दाम आणि हिंदुस्थानचे 'अटलबिहारी' यात फरक करणे कठीण आहे.
 आंतरराष्टीय बहिष्काराचा धोका चाचणीचा निर्णय घेण्यापूर्वी वाजपेयी शासनाच्या लक्षात आला नव्हता असा युक्तिवाद बाष्कळपणाचा होईल. परिणामांची पुरेपूर जाणीव ठेवून घेण्यात आलेला हा निर्णय आहे. आंतरराष्ट-ीय व्यापारातील हिंदुस्थानने लादलेल्या प्रतिबंधांबद्दल जागतिक व्यापार संस्थेच्या दरबारात अनेक प्रकरणे चालू आहेत. त्यातील बहुतेकांचा निर्णय भारताच्या विरुद्ध लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या माथी दोष न घेता आर्थिक क्षेत्रात जगापासून फारकत ठेवण्याचा हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे.

 आतापर्यंतच्या लक्षणांवरून तरी ही रणनीती यशस्वी आणि लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे. कोणाही विरोधी पक्षाची अणुचाचण्यांविरुद्ध 'ब्र' काढण्याची हिम्मत झालेली नाही. सर्वांनी हा मुद्दा राष्टीय सुरक्षेचा असल्यामुळे आपली सहमती दाखविली आहे. सर्वजणच देशी विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्या स्तुतिस्तोत्रपाठात सामील झाले आहेत.

११८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने