पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चाचणीविषयी बोलताना जवळजवळ एकच पालुपद घोळवितात. हा प्रश्न राष्ट-च्या सुरक्षेचा आहे. आम्ही निर्णय घेऊ ते आमच्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेऊ. त्यात कोणाची ढवळाढवळ सहन करणार नाही; इत्यादी इत्यादी.
 अण्वस्त्रे तयार केल्यामुळे देशाची सुरक्षितता कितपत सुधारते? संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे अलिकडचे एक निवेदन 'चीन हाच आमचा सर्वात मोठा शत्रू आहे.' सोडल्यास पाकिस्तान हेच प्रमुख शत्रुराष्ट- आहे. त्याच्याशीच आतापर्यंत तीन मोठी युद्धे लढावी लागली. आजही काश्मिर, पंजाब आणि इतरत्र पाकिस्तानच्या अतिरेकी आणि घातपाती कारवायांना तोंड द्यावे लागत आहे. गेली पन्नास वर्षे हिंदुस्थान व पाकिस्तान यांच्यात एक अघोषित युद्ध सतत चालूच आहे. चीन अण्वस्त्रांच्या क्षेत्रात आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहे. पारंपरिक शस्त्रास्त्रांनी चीनशी खुलेआम युद्ध लढणेही मोठे दुष्कर होईल; अण्वस्त्रांच्या बाबतीत तर चीनशी तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. थोडक्यात, अण्वस्त्रांच्या विकासाने हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेस मजबुती येईल असे म्हणणाऱ्यांच्या मनात शत्रुराष्ट- म्हणून फक्त पाकिस्तानच असू शकते.
 हिंदुस्थानी लोकांच्या डोक्यात पाकिस्तानविषयी एक अगदीच अजागळ गंड आहे. आकाराने, अर्थसामर्थ्याने आणि लष्करी तयारीत पाकिस्तान ही ताकद हिंदुस्थानच्या तुलनेत वीस टक्केसुद्धा नाही. काही आधुनिक विमाने आणि अस्त्रे यांबाबतीत प्रमाण कमी व्यस्त आहे. पण, कोणत्याही युद्धात पाकिस्तान हिंदुस्थानवर मात करू शकेल ही गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे. या परिस्थितीची पाकिस्तानी नेत्यांना चांगली जाणीव आहे. त्यामुळेच, पाकिस्तानी अंदाजपत्रक आणि अर्थव्यवस्था या दोघांवरही लष्करी खर्चाचा बोजा फार मोठा आहे. तेथील राजकारणावरही लष्कराचे प्रभुत्व सतत राहाते याचे कारण हिंदुस्थानविरुद्ध लष्करी तयारी हे त्यांच्या अंतर्गत आणि परराष्टीय धोरणांचे मुख्य सूत्र आहे.

 अणुबाँब संपादन केल्यामुळे पाकिस्तानबरोबरच्या संघर्षातील परस्पर बलात काय फरक पडू शकतो? आजमितीस तरी त्यामुळे पाकिस्तानची बाजू वरचढ झालेली दिसते. आंतरराष्टीय क्षेत्रातील हिंदुस्थानची एक शांतताप्रिय

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
११५