पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अणुबाँबचा प्रयोग करण्याचा मोह ५० वर्षे कटाक्षाने टाळला आहे. रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध मोठ्या गरमाहटीने चाळीस वर्षे चालले. सारी पृथ्वी पंचवीसतीस वेळा समूळ नष्ट करण्याइतकी अण्वस्त्रे दोन्ही महासत्तांकडे मौजूद होती. कितीएक संघर्षाचे प्रसंग उद्भवले. जागतिक युद्धाची ठिणगी आता उडते की काय अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली. खुश्चेवने क्यूबामधील अस्त्रे परत घेऊन एका तऱ्हेने हार स्वीकारली. व्हिएतनाममध्ये तर बलाढ्य अमेरिकन महासत्तेचा अपमानजनक पराभव झाला. पण, अशाही परिस्थितीत अण्वस्त्रांच्या नियंत्रणाचे बटण दाबण्याचा मोह महासत्तांच्या राष्ट-प्रमुखांनी टाळला. अशा तऱ्हेचा संयम आणि मुत्सद्दी सुज्ञपणा सगळ्याच राष्ट-प्रमुखांकडे असेल असे कोणीच म्हणणार नाही. इदी अमीन आणि गद्दाफी यांसारख्या राष्ट-प्रमुखांकडे अणुविस्फोटाची शक्ती राहिली तर जगाला सुखाने झोप घेणे अवघड होईल हे उघड आहे. हिंदुस्थानी, पाकिस्तानी लोकांना हे सत्य पचवणे कठीण जाईल; पण, दोन्ही देशांची गणना जबाबदार राष्ट-ात केली जात नाही. एखादे देऊळ किंवा मशीद, फार काय क्रिकेटचा सामना किंवा एखाद्या कलावंताचा कार्यक्रम या विषयावर ज्या देशातील मान्यवर नेतेही माथेफिरूसारखे बोलतात, हातात जी जी काही साधने असतील - सुरे, तलवारी, पिस्तुले, मशीनगन, स्फोटके - त्यांचा बिनदिक्कत वापर करून मुडदे पाडतात आणि त्यासंबंधी खुलेआम शेखी मिरवतात; राष्ट-, धर्म अशी नावे घेऊन आपल्या बर्बरतेचे समर्थन करतात त्या देशांना जगाने अण्वस्त्र संपादनास पात्र मानावे कोणत्या आधाराने? मशिदी पाडणारे, खेळाची मैदाने उद्ध्वस्त करणारे, मान्यवर कलावंतांना हैराण करणारे भारतीय नेते आणि धर्माचा उद्घोष आणि परधर्मीयांचा विद्वेष केल्याखेरीज ज्यांना राजकीय स्थान टिकवणे शक्य नाही अशा पाकिस्तानी नेत्यांच्या हाती अण्वस्त्रे आली तर केवळ जिद्दीपोटी - पृथ्वी बुडते का जगते याचा विचार न करता – ही मंडळी खुशाल एकमेकांवर अण्वस्त्रांचा प्रयोग करतील अशी आशंका जगाला वाटली तर त्यांना दोष देणे कठीण आहे.
राष्टीय सुरक्षेत काय फरक पडणार?

 हिंदुस्थान आणि पाकिस्तान, दोन्ही देशांचे पंतप्रधान अणुस्फोटांच्या

११४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने