पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निवडणुकीनंतर देश चालवण्याची जबाबदारी येऊन पडताच अर्थशास्त्रज्ञांच्या व्याकरणात उलथापालथ करणे शक्य नाही, पावलापावलाने ‘स्वदेशी' सौम्य करत जावी लागेल, अंततोगत्वा स्वदेशीबरोबरच राष्ट-भावना मंदावत जाईल; स्वदेशी राष्ट-भावनेचे युग पुन्हा एकदा आणायचे असेल तर एकच मार्ग आहे; सर्व 'फॉरेन' वस्तूंची 'क्रेझ' असलेले हिंदुस्थानी विलायती गोष्टींचा हव्यास सोडून स्वदेशीकडे वळतील हे आता शक्य नाही, 'स्वदेशी स्वदेशी'च्या उद्घोषात प्रत्यक्ष स्वार्थ जोपासला गेला तो काही मूठभर कारखानदारी घराण्यांचा, त्यासाठी शेतकरी आणि ग्राहक यांना प्रचंड बोजा सहन करावा लागला, आता शेतकरी आणि ग्राहक सहजासहजी स्वदेशीच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत हे भाजपा आणि स्वदेशी जागरण मंच इत्यादी साऱ्या परिवारास स्पष्ट झाले. देश स्वदेशीचा स्वीकार राजीखुषीने करत नसेल तर साऱ्या जगापासून त्याला बाजूला काढण्याचा एक मार्ग आहे. ब्रह्मदेशाने जाणीवपूर्वक जगापासून दूर व्हायचे ठरवले. वाजपेयी शासनाने मोठी युक्ती लढवली. साऱ्या जगाकडून देशाला बहिष्कृत करून घेतले म्हणजे आपोआपच 'स्वदेशी' अर्थव्यवस्थेखेरीज काही पर्यायच राहात नाही. अटलबिहारींच्या अणुस्फोटाच्या पाच चाचण्या जगाला जोडणारे पूल जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करून राष्टीय भावनेच्या उद्घोषात 'स्वदेशी' कंपूचे हित साधण्याचा प्रयत्न आहे.
संशोधन तस्करांची कुर्रेबाजी

 'शेवग्याचे झाड' तोडणारी कुऱ्हाड एवढाच या चाचण्यांचा खरा अर्थ आहे; अन्यथा, त्याला दुसरा काही अर्थच असू शकत नाही. अणुविस्फोट ही काही आता विज्ञानाच्या क्षेत्रातील नवलाच्या करामतीची गोष्ट राहिलेली नाही. उत्सर्गी द्रव्य पर्याप्त प्रमाणात संपादन करू शकणारा देश काय, व्यक्तिदेखील अशा तऱ्हेच्या अणुचाचण्या करू शकते. अमेरिकेतील 'टाईम'सारख्या साप्ताहिकाने सारा तांत्रिक तपशील छापून प्रसिद्ध केला, त्यालाही १० वर्षे होऊन गेली. बऱ्यापैकी प्रयोगशाळा हाताशी असलेला कोणीही विद्यार्थी घरबसल्यादेखील अशा चाचण्या करू शकतो हे सर्वमान्य आहे. किंबहुना, निव्वळ शास्त्रीय कारणासाठी अशा चाचण्या करण्यात काही अर्थ राहिला नाही. चाचण्यांचे सारे निष्कर्ष तपासून पाहाण्यासाठी

११२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने