पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुखांतिका होण्याची संभाव्यता, आकडेवारीने पाहू गेले तर, फारशी नाही.
झाड तोडू नका, लागवड करा
 शेवग्याच्या झाडाविषयी मी लेख लिहिला त्यावेळी ते झाड समूळ कापून टाकण्याचा उपद्व्याप कोणाला सुचला नाही. उलट, दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानामुळे राष्ट्राराष्ट्रातील सरहद्दींच्या भिंती कोसळत गेल्या, संचार आणि वाहतूक क्षेत्रातील क्रांतीमुळे सारे जग लहान होऊ लागले आहे. जागतिक व्यापारातील आणि देवघेवीतील अडथळे दूर करून सारी व्यापारी देवघेव, गुंतवणूक अधिकाधिक मुक्त असावी या विचाराला अधिकाधिक मान्यता मिळत गेली. खुलेपणास विरोध करणारी मंडळी स्वदेशी राष्ट-भावनेस गोंजारून मताचा काही लाभ घेण्याचा प्रयत्न करतात; पण 'देवेगौडा' काय आणि 'स्वदेशी जागरण मंच'वाले काय – सत्तेची जबाबदारी अंगावर येऊन पडली म्हणजे खुलेपणाचीच भाषा बोलू लागतात; जागतिक व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचीच आवश्यकता प्रतिपादन करू लागतात. थोडक्यात, शेवग्याचे झाड तोडून उत्कर्ष साधण्याची भाषा बाजूला पडली आणि त्याऐवजी 'शेवग्याची लागवड करावी, त्याच्या बियांवर प्रक्रिया करून मौल्यवान तेलाचे उत्पादन करावे आणि शेंगेच्या गराचा उपयोग औषधी कामासाठी करावा, त्यासाठी आवश्यक तर इतरेजनांकडून कर्ज घ्यावे, तंत्रज्ञान घ्यावे अशा तऱ्हेची विचारसरणी सर्वदूर सर्वमान्य होत होती.
अणुचाचण्यांची कु-हाड
 आणि एका रात्रीत कोणा पाहुण्याने 'शेवग्या'ची सारी लागवड उद्ध्वस्त करण्याचा खटाटोप केला, एवढेच नव्हे तर प्रक्रियेसाठी तयार होत असलेला छोटासा उद्योग उद्ध्वस्त केला, उद्योगाच्या विकासासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देऊ करणाऱ्या शेजाऱ्यांशी भांडण उकरून काढले. प्रेमचंदांच्या कहाणीचा आधुनिक आविष्कार दोन टप्प्यात अण्वस्त्रांच्या पाच चाचण्या करून वाजपेयी शासनाने घडवून आणला!

 गेल्या आठवड्यात भारताने केलेल्या अणुचाचण्यांचा अर्थ यापरता वेगळा लावणे कठीण आहे. भाजपा हा केवळ पर्यायी पक्ष नाही, ती एक वेगळी राष्ट-वादी प्रवृत्ती आहे, विचारधारा आहे असे वाजपेयींपासून त्या पक्षाचे गल्लीबोळातील नेते सातत्याने आणि उघडपणे सांगत आले आहेत.

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१११