पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सारी, संकट तोंडावर आले असता समाजात संचरणाऱ्या चैतन्यशक्तीचा इतिहास घडवण्यासाठी झालेल्या वापराची उदाहरणेच आहेत.
उन्माद स्थायीभाव नाही
 पण, आपत्ती ओढवली असता वाटेल त्या त्यागास, बलिदानास तयार करणारे चैतन्य ही एक प्रकारची उन्मादावस्था असते; मनुष्यप्राणी आणि समाज यांच्या जीवनाचा तो स्थायीभाव असू शकत नाही. सर्वसामान्य माणसांना जगायचे असते, आयुष्याचा अनुभव घ्यायचा असतो, सुखांचा उपभोग घ्यायचा असतो; धर्म, अर्थ, काम यांबरोबरच समाज आणि मोक्ष हे पुरुषार्थही संपादन करायचे असतात. अशा सुफल आयुष्याची शक्यता जिवंत राहावी यासाठी, आवश्यक पडल्यास, संकटकाळी तो सर्व हिशेब बाजूला ठेवून स्वत:ला झोकून देण्यास तयार होतो. बेफाम उन्मत्त चैतन्याचा हा अनुभव मोठा स्फूर्तीचा स्रोत असतो. पण, असे चैतन्य आणि बलिदान ही जीवनशैली होऊ शकत नाही.
 दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुतेक हुकुमशहांना आणि अनेक क्षुद्रवादी नेत्यांना आपत्कालीन चैतन्य हाच माणसांचा आणि समाजाचा सतत टिकणारा स्थायीभाव असावा असे वाटते. ज्या देशात लोकांना आपल्या राष्ट्राविषयी प्रेम अधिक, राष्ट्रासाठी त्याग करण्याची जेथे तयारी अधिक ते देश प्रगती करतात असा त्यांचा विश्वास असतो. राष्ट-प्रेमाची निर्मिती हा अशा मंडळींच्या मते देशाच्या थोरवीचा एकमेव मार्ग असतो. राष्ट्र, धर्म, जाती, इतिहास, पूर्वजांची थोरवी आणि त्याहीपेक्षा दुसऱ्या एखाद्या जाती-जमाती-राष्ट्राचा विद्वेष अशा गोष्टींच्या आधारे माणसाच्या आणि समाजाच्या अस्मितेला गोंजारले, त्यांच्या अहंकाराला जोपासले की त्यातून निर्माण होणारे चैतन्य हीच विकासाची खरी ऊर्जा अशा भावनेपोटीच इतिहासभर अनेक प्रसिद्ध पुरुषांनी राष्ट-भावनांना हाक घातली, प्रचंड युद्धे घडवून आणली, लक्षावधींच्या कत्तली केल्या, मुलुखच्या मुलुख बेचिराख केले. पण, एकालाही सतत, धीमेपणे पावलापावलाने का होईना, प्रगती करणारे समाज तयार करता आले नाहीत.

 थोडक्यात, शेवग्याचे झाड कापून टाकणाऱ्या पाहुण्याने एक मोठा धोक्याचा निर्णय घेतला. प्रेमचंदांच्या कथेत शेवट गोड झाला. अशी

११०
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने