पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केल्याची खुलेआम चर्चा होऊ लागली. थोडक्यात, शेवग्याचे झाड तुटलेले पाहिले की प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. निराशेने आणि वैफल्याने ग्रस्त होऊन निष्क्रिय होणारेच बहुसंख्य. क्षणमात्र का होईना, तिरीमिरीने तडफेने कामाला लागणारे तुलनेने दुर्मिळ आणि पहिला उत्साह सातत्याने टिकवून ठेवून नेटाने अथक प्रयत्न चालू ठेवणारी माणसे त्याहून दुर्मिळ आणि अशा गुणवत्तेचे देशतर त्याहूनही विरळा.

 कुटुंबावर, गावावर, समाजावर, जातीवर, धर्मावर, देशावर संकट कोसळताच माणसांमध्ये एका चैतन्याचा संचार होतो. त्या चैतन्याच्या भरात माणसे अद्भूत कामे करून जातात. पण, हे चैतन्य आणि त्यासाठी करायच्या कष्टांची आणि बलिदानाची तिरीमिरी अल्पजीवी असते. इस्रायली लोकांनी जवळजवळ दोन हजार वर्षे मायदेश निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि तडीस नेते. आपला म्हणून कोणता एक प्रदेश नाही आणि जगभर साऱ्या देशात ज्यू जमातीचा अवमान आणि शिरकाण होत आहे अशा परिस्थितीत ही चैतन्याची उर्मी १९ शतके टिकली, ही मोठी विशेष गोष्ट. सारा रशिया नेपोलियनने व्यापला आणि नंतर हिटलरनेही पादाक्रांत केला. लक्षावधी लोक ठार झाले. रशियावर अन्नाला मोताद होण्याची वेळ आली आणि तरीही नेपोलियन आणि हिटलर यांच्या फौजांना मागे हटवीत हटवीत रशियन सैन्याने आणि जनतेने प्रचंड शौर्याने आणि कमालीच्या चिवटपणाने झुंजत झुंजत मागे पिटाळून लावले. खुद्द राजधानी लंडन शहरावर अहोरात्र बाँबचा वर्षाव होत असताना 'देशाला देण्यासाठी माझ्याकडे रक्त, अश्रू आणि घाम याखेरीज काहीच नाही,' अशी घोषणा करणाऱ्या चर्चिलने पाच वर्षे एकाकीपणे शर्थीची झुंज दिली. आणि शेवटी विजय संपादन केला. अल्लाउद्दिन खिलजी पद्मिनीवर नजर ठेवून आहे ही जाणीव होताच सारे राजपूत वीर केसरीया बनले, स्त्रियांनी जोहार केले आणि शत्रूच्या फळ्यांमध्ये घुसून लढत लढत वीरांनी बलिदान दिले. चारी दिशांचे प्रदेश शत्रूने व्यापलेले. स्वकीयांपैकी बहुतसारेजण यवनांच्या दरबारात सामील झालेले. अशा परिस्थितीत मूठभर मावळ्यांची फौज उभी कर, कोणा देशमुखाशी सोयरीक जमव, कोणा मोऱ्याचा उच्छेद कर, अंगावर आलेल्या मुसलमान फौजांना युक्तियुक्तीने, गनिमी काव्याने त्रस्त करून सोड असा शिवाजीचा उपक्रम. ही

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१०९