Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रेमचंदांच्या कहाणीतल्याप्रमाणे गोड शेवट क्वचित् कोठे पूर्वजांच्या पुण्याईमुळे घडतही असेल. आकडेवारीने पाहायचे झाले तर अशा परिस्थितीत बरबाद होऊन जाणाऱ्या घरांची संख्याच कितीतरी पटीने अधिक भरेल. देशांचा इतिहास पाहिला तर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी जिद्दीने दीर्घकाळपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याची उदाहरणे फारच कम
चैतन्याचा लखलखाट
 शत्रूचा हल्ला झाला, भूकंपमहापूर अशा नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तर काही काळ संकटाच्या विक्राळतेसमोर सारे हिणकस कुंठित होते; समाजात एक नवीन बंधुभावाची, ऐक्याची लाट पसरते. लोक केवळ पैसाअडका ओतायला तयार होतात एवढेच नव्हे, तर प्राणावर धोका घेऊन रक्त सांडण्यासही तयार होतात.
 १९६२ साली चीनशी युद्धाचा प्रसंग आला. गाठ बलाढ्य शत्रूशी होती. सर्वच बाबतीत आपण कमी पडत होतो. तरीदेखील हिमालयाच्या रक्षणासाठी सारा देश एकत्र झाला. बायाबापड्यांनीदेखील सैन्यातील जवानांच्या मदतीसाठी अंगावरचे दागदागिने उतरवून देऊन ढीग घातले. सुदैवाने, ती सारी लढाई २१ दिवसच चालली. चीनने आपले सैन्य एकतर्फी काढून घेतले नसते, चिनी सैन्य हिमालयातून खाली उतरून गंगायमुनेच्या खोऱ्यात उतरले असते आणि साऱ्या सीमा खरोखरच इंचाइंचाने लढवण्याची वेळ आली असती तर हिंदुस्थान देशवासियांचा उत्साह किती वर्षे टिकून राहिला असता याबद्दल मोठी शंका आहे.

 किल्लारीला भूकंप झाला. मृत्यूच्या तांडवाने थैमान घातले. साऱ्या देशातून आणि जगभरातून मदतीचे पूर लोटले. साऱ्या लोकांनी ज्या तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली आणि जीवाची बाजी लावली त्याचे सर्वत्र मोठे कौतुक होऊ लागले. कौतुकाच्या शब्दांचे ध्वनीप्रतिध्वनी विरतात न विरतात तोच दगडामातीच्या ढिगाऱ्यात पडलेल्या प्रेतांच्या अंगावरचे दागिने काढून नेण्यासाठी भुरटे चोरटे हल्ले करू लागल्याच्या आणि त्यात पोलीसही सामील झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. परदेशातून मदतीच्या रूपाने आलेले कपडे, अन्नधान्याचे डबे मान्यवर पुढाऱ्यांच्या कुटुंबियांची आणि दोस्त मंडळींची शरीरे आणि घरे सजवू लागले. नेते मंडळींनी कोट्यवधींच्या माया जमा

१०८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने