आर्थिक ढाचा मुळापासून बदलला पाहिजे अशी भाषा आज कोण करतो आहे? असे बोलणारा प्रत्येक अर्थशास्त्री नेहरू-अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा होता. आज त्याना उपरती झाली कोठून? हे अर्थशास्त्रज्ञ इंग्रजी पुस्तके वाचून शिकलेले, देशाच्या बटाट्याच्या बाजारपेठेचीसुद्धा माहिती नसलेले. बहुतेक सगळे पगारी चाकर. त्यामुळे शेतीच्या लुटीत सर्वांनाच स्वारस्य. त्याकरिता आवश्यक तो सगळा बौद्धिक अप्रामाणिकपणासुद्धा करण्याची तयारी. नेहरूअर्थव्यवस्थेवर त्यांचे विशेष प्रेम. कारण त्या अर्थव्यवस्थेने अर्थशास्त्रातील पदवीधरांना नोकऱ्यांची मोठी संधी उपलब्ध करून दिली. यातलीच काही मंडळी आता अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या कामास लागली आहे. हे दृश्य पाहूनसुद्धा, त्याचे परिणाम भयानक नसते तर, हसू आले असते.
आजच्या परिस्थितीत खरेखुरे अर्थशास्त्र सांगणारा पंडीत मला कुणी दिसत नाही. प्रसिद्ध हिंदी साहित्यकार प्रेमचंद आज आपल्यात नाहीत. माझ्या हाती असते तर प्रेमचंदांना अर्थमंत्री बनवले असते. प्रेमचंदांची एक गोष्ट आहे. एक जुने खानदानी घराणे बाप मेल्यावर अगदी रसातळाला जाते. मागे राहिलेल्या भावाभावांना काम करणे ही कल्पना सहन न होण्यासारखी. मग त्यांनी जगावे कसे? परसदारात एक शेवग्याचे झाड होते. खूप शेंगा देणारे. त्याच्या शेंगा काढून दिवस उजाडायच्या आत गुपचूप बाजारात पाठवायच्या आणि आलेल्या पैशावर कसेबसे दिवस काढायचे. हे असे काही काळ चालले. एक दिवस वडिलांचे एक जुने मित्र पाहुणे म्हणून आले. त्यांचे आदरातिथ्य भावांनी कसोशीने केले, पण या पाहुण्याच्या लक्षात आले की, ह्या शेवग्याच्या झाडाच्या आधाराने सगळे कुटुंब अपंग बनले आहे. जाण्यापूर्वी पहाटेच्या अंधारात त्याने शेवग्याचे झाड तोडून टाकले व तो गुपचूप निघून गेला. सकाळी झाड पडलेले पाहून सर्व भावांनी पाहुण्यास खूप शिव्या दिल्या. काही दिवस उपास काढले, आणि शेवटी काहीच इलाज चालेना तेव्हा काम धंद्यास लागले. त्यांची लवकरच भरभराट झाली आणि मग त्यांच्या लक्षात आले की, शेवग्याचे झाड पाडणाऱ्या त्या निर्दयी पाहुण्याने त्यांच्यावर खरोखर खूप मोठे उपकार केले होते.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर धनी संस्था आमची शेवग्याची झाडे