पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपासमारीला तोंड देणे भाग आहे, हे साऱ्यांच्या लक्षात आले. सर्वांनी मोठा आकांत केला. वडिलांचा जवळचा स्नेही म्हणून स्वागत केलेल्या पाहुण्याने असे नीच कृत्य का केले, कोणालाच कळेना. पाहुण्याच्या नावाने सगळ्यांनी शिमगा केला. अगदीच उपासमारीची वेळ आली तेव्हा सारी जनलज्जा आणि खानदानाचा मोठेपणा बाजूला ठेवून सारी माणसे झटून कामाला लागली. आणि, काही वर्षातच पुन्हा एकदा घरात लक्ष्मी नांदू लागली. पाहुण्याने शेवग्याचे झाड तोडून सर्वांना पुरुषार्थाचा मार्ग पकडण्यास भाग पाडले हे त्यांच्या लक्षात आले. सर्वांनी मनोमन पाहुण्याला धन्यवाद दिले.
कहाणीचा पर्यायी शेवट
 प्रेमचंदांची कहाणी थोडक्यात अशी आहे. ज्यावेळी मी हा लेख लिहिला त्यावेळी जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी वाटाघाटी चालू होत्या. उद्योगधंद्यात मंदी, निर्यात दरवर्षी अधिकाधिक घसरती, आयातीची मात्र चढती कमान अशा परिस्थितीत परकीय मदत आणि जागतिक बँकेचे कर्ज यांच्या आधाराने अर्थव्यवस्था रडतखडत चालली होती. जागतिक बँकेने कर्ज देण्याचे नाकारले तर काय होईल? सुरुवातीस मोठ्या अडचणी येतील, मोठे संकट कोसळले असे वाटेल; पण, काय सांगावे, प्रेमचंदांच्या कहाणीतील जमीनदाराच्या पोरांप्रमाणे, शेवग्याच्या झाडाचा आधार तुटला हे स्पष्ट झाले तर सारे देशवासी झटून कामाला लागतील; त्रास संकटे सोसण्यास तयार होतील; पुरुषार्थाचा मार्ग धरतील आणि त्यातून कदाचित्, देशाचे भले होईल. पण, शेवग्याचे झाड तोडायची हिम्मत कोण करेल?

 प्रेमचंदांच्या कहाणीत शेवग्याच्या झाडाचा आधार सुटल्यानंतर सारे कुटुंबीय कामाला लागले, त्यांनी पुरुषार्थाची कास धरली. तशी त्यांची बुद्धी नसती तर काय झाले असते? झाड तोडल्याने घरात पुन्हा लक्ष्मी नांदू लागेल ही एक शक्यता; पण साऱ्या घराची धूळधाण होईल, सारे अन्नाला मोताद होतील हीच शक्यता अधिक. शेवग्याचा आधार तुटला हे समजल्यावर कष्टाला लागणे आणि नेटाने, कसोशीने सातत्याने प्रयत्न करत राहणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. झाड पडल्याच्या पहिल्या धक्क्यापोटी हिरीरीने कामाला लागणे हे महत्त्वाचे, पण तो निश्चय टिकवून धरणे आणि शेवटपर्यंत तडीस नेणे हे त्याहून कठीण आहे.

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१०७