पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११. शेवगा तोडा, पाय नको


प्रेमचंदांची कहाणी

 सात वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता; लेखाचे नाव 'नाणे निधी - शेवग्याचे झाड.' (लेख १) याच शीर्षकाची प्रेमचंदांची एक मोठी प्रसिद्ध कथा आहे. एका मोठ्या जमीनदाराचे खानदान. चार-सहा मुले, सुना, नातवंडे असे मोठे खटले. थाट सगळा देशमुखी. कामे करायची ती सारी नोकराचाकरांनी. घरच्या माणसांनी कामाला हात म्हणून लावायचा नाही. घराण्याचे नाव मोठे. त्यामुळे, सावकार दागिने गहाण ठेऊन घेऊन जमिनी लिहून घेऊन गरज पडेल त्याप्रमाणे कर्ज पुरवीत होते. सारा मोठा बारदाना चालत राहिला. कुणाला काही कमी नाही. साऱ्यांची चंगळ चाललेली. आणि कर्जाचा बोजा वाढत राहिला. एक दिवस अचानक जमीनदार मरून गेले. सावकारांचे तगादे सुरू झाले. कर्जे फेडता फेडता जमीनजुमला दागदागिने सारे धुवून गेले. राहाता जुना वाडाच काय तो राहिला. घर चालावे कसं? कामाची सवय कोणालाच नाही. सुदैवाने, कोणाला व्यसने वगैरे काही नव्हती. पण, दिवसभरात तीन वेळा घरातल्या सगळ्या लोकांसमोर काही चटणी भाकरी तरी आली पाहिजे? ती सोय व्हावी कशी? सुदैवाने, वाड्याच्या परसात शेवग्याच्या शेंगाचे एक जुने मोठे झाड होते. वर्षभर भरपूर शेंगा येत. जमीनदाराच्या पोरांनी एक युक्ती काढली. भल्या पहाटे अंधारात शेंगा तोडून बाजारात विक्रीला पाठवून द्यायच्या; काय येतील त्या पैशात ओल्या कोरड्याची होईल तशी व्यवस्था करायची असा क्रम काही दिवस चालत राहिला. वडिलांचे एक जुने स्नेही एक दिवस पाहुणे म्हणून मुक्कामाला आले. दोनतीन दिवसातच सारी परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. एवढ्या खानदानी घराची अशी अवस्था झालेली पाहून पाहुण्याला मोठे दु:ख झाले. एक दिवस सगळीकडे सामसूम आहे असे पाहून पाहुणा उठला आणि कुन्हाडीने त्याने शेवग्याचे सारे झाड मुळापासून तोडून टाकले आणि अंधारातच, तो कोणाला न सांगता सवरता निघून गेला. दुसरे दिवशी पहाटे नित्यनियमाप्रमाणे पोरे शेंगा तोडायला गेली तर सारे झाडच खाली आलेले. सगळ्या शेंगांवर फार तर आठदहा दिवस गुजराण होईल, पण नंतर

१०६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने