समाधान घसरत जाईल हे खरे; पण, आमदनीच्या प्रत्येक नव्या रुपयापासून होणारे समाधान घटत जाईल असे नाही. दोन वेगवेगळ्या माणसांच्या मनातील उपभोगसौख्याची तुलना करणे तर अगदीच अशक्यप्राय आहे. उपाशी माणसाची भूक तीव्र, ती शमविण्यासाठी तो प्रचंड खटाटोप करेल; ज्याची भूक कमी तीव्र त्याचा खटाटोप तुलनेने कमी तीव्र राहील असे म्हणावे तर इतिहास त्याला साक्षी राहात नाही. दुष्काळाच्या काळात माणसे उपासमारीने मरून पडतात, पण धान्याच्या गोदामांवर हल्ले करून धान्य लुटण्याचा प्रयत्न करीत नाहीत. उलट तुलनेने, चैनीच्या वस्तूंचा तुटवडा पडताच चैनी माणसे आकाशपाताळ एक करून टाकतात हा अनुभव नेहमी येतो.
मोरारजी देसाई अर्थमंत्री असताना त्यांनी जवळजवळ साऱ्याच परदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली; प्रसाधनांच्या वस्तूंवरही बंदी घातली. आयातीवरील नियंत्रणे साऱ्या देशाने मुकाटपणे सहन केली. पण, दिल्लीतील उच्चभ्रू समाजातील महिला तक्रारी घेऊन पंडीत नेहरूकडे गेल्या आणि त्यांना लागणाऱ्या प्रसाधनसाधनांचे उत्पादन देशातल्या देशात सुरू व्हावे याची तजवीज त्यांनी करून घेतली.
मनुष्यप्राणी समान आहेत, पण ती एका मुशीतून काढलेली बाहुली नाहीत. प्रत्येक प्राणी वेगळा आहे, अनन्यसाधारण आहे हे त्यांच्यातील समानतेचे सूत्र आहे. हे न समजल्याने धर्मवादी फसले, समाजवादीही फसले. करुणा आणि विषमतानिर्मूलन यांना काही तार्किक पाया देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पिगूने अर्थशास्त्र्यांना त्याच मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. 'सौख्याचे अर्थशास्त्र' आपल्या पायावर कधी उभे राहिलेच नाही. पण, प्रत्यक्ष शासकीय धोरणावर त्याचा प्रभाव प्रचंड आहे. श्रीमंतांवर कर बसवून गरीबांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्या असे कार्यक्रम सर्वच पक्ष आग्रहाने मांडतच असतात. बिनबुडाचा हा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन दररोजच्या शासकीय अर्थकारणात महत्त्वाचा ठरला आहे. कारण उघड आहे. राजकीय शासनाच्या हाती अर्थकारणाची सूत्रे गेली. दरडोई एक मत हे तत्त्व अर्थकारणातही लागू झाले. पिगूची अशास्त्रीय गृहीततत्त्वे प्रत्यक्षात खरी मानली गेली. अशास्त्रीय पिगू प्रत्यक्षात मोठी मान्यता मिळवून व टिकून आहे.
(६ मार्च १९९८)