पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळाल्या असत्या तर एकूण बारा भाकऱ्यांपासून दोघांना मिळून होणारे सौख्य सर्वात अधिक झाले असते.
 एकेका घासापासून मिळणाऱ्या आनंदाचे मोजमाप करता येईल; सर्व उपभोगांतून मिळणारा आनंद कमी कमीच होत जातो आणि उपभोगाची सर्व मनुष्यप्राण्यांची क्षमता सारखीच असते ही पिगूची गृहीततत्त्वे. त्यांच्या आधाराने त्याने समाजधुरीणांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे मांडली.
 - राष्ट्रीय संपत्ती वाढली म्हणजे आर्थिक सौख्यात वाढ होते हे खरे. फक्त या वाढीव उत्पादनासाठी लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध श्रम करण्याची सक्ती होता कामा नये.
 - राष्ट्रीय उत्पादनातील गरीबांचा वाटा वेगवेगळ्या मार्गांनी वाढविता येतो. आणि, काही अपवाद सोडल्यास गरीबांचा वाटा वाढविल्याने सामाजिक सौख्यात वाढ होते. फक्त अशा कार्यक्रमांमुळे उद्योजकांचे प्रोत्साहन कमी होऊ नये आणि गुंतवणूक व उत्पादन यांवर विपरीत परिणाम होऊ नये.
 पिगूच्या सौख्याच्या अर्थशास्त्राचे, त्यातील गृहीततत्त्वांचे, तर्कशास्त्राचे आणि विश्लेषणाचे अर्थशास्त्र्यांनी वाभाडे वाभाडे काढले. पण दीनदुबळ्या करुणेपोटी दानधर्म करण्याची धार्मिकांची करुणेवर आधारित परंपरा आणि समाजवाद्यांची गरीबांसंबंधीची कळकळ या दोघांनाही पिगूच्या मांडणीने, थोडासा शास्त्रीय वाटणारा आधार मिळाला.

 माणसे समान असतात; सारी देवाची लेकरे; त्यात विषमता नाही या सर्वमान्य तत्त्वांचा मोठा विपरीत अर्थ पिगूच्या सौख्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. सारी माणसे एकाच ठशाची, एकसारखीच आहेत; दोन माणसांना येणारे सुखदु:ख, गरम आणि थंड यांचे अनुभव एकसारखेच असतात; जांभळा रंग म्हटला की 'अ'च्या मन:पटलावर ज्या रंगछटेची अनुभूती होते तीच 'ब'च्याही मनात होते या कल्पनांना काही आधार नाही. प्रत्येक माणसाला वाढत्या उपभोगाबरोबर होणारा आनंद कमी होत जातो हे खरे. पण, माणसे काही तीच तीच वस्तू उपभोगत नाहीत; उपभोगाच्या वस्तूंची विविधता वाढवीत राहतात. भाकरीबरोबर कोरड्यास घेतात; चपात्या, पुऱ्या, मांडे, मिठाई असे नवनवे पदार्थ शोधून काढून उपभोगसौख्याची कमान वाढती राहील अशी व्यवस्था ते करतात. भाकरीच्या प्रत्येक घासापासून मिळणारे

१०४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने