पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिकाधिक घटत जाईल.
 घसरत्या संतुष्टीच्या आधाराने सामाजिक अर्थशास्त्राचे काही आधार बनविण्याचा अगदी पहिल्याने प्रयत्न, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर पिगू नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने १९४६ साली “सामाजिक सौख्याचे अर्थशास्त्र Economics of Welfare" हे पुस्तक प्रसिद्ध करून केला. त्याच्या या पुस्तकाचा दहावीस वर्षे दबदबा राहिला. वेगवेगळ्या रंगछटांच्या समाजवाद्यांनी पिगूच्या अर्थशास्त्राचा वारंवार उपयोग केला. पिगूच्या साऱ्या विश्लेषणाचा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी पार धुव्वा उडविला आहे. पण तरीही, सरकारी अर्थकारण, अंदाजपत्रकातील धोरणे, सरकारी कल्याणकारी योजना या सर्वांमागे अजूनही पिगूचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
 मनुष्यप्राण्याच्या सौख्याची अनेक साधने आहेत : मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक, कलासंबंधी इत्यादी, इत्यादी. ज्या सौख्यांचे मोजमाप पैशाच्या आधाराने करता येते त्याला आर्थिक सौख्य म्हणावे ही पिगूची व्याख्या. आर्थिक सौख्य वाढले म्हणजेच समाजाचे सर्वार्थाने भले होते हे खरे नाही. आर्थिक सौख्याचा सर्वसाधारण समाजाच्या भल्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो. देशातील एकूण राष्ट्रीय उत्पादन हे त्या देशातील आर्थिक सौख्याचे एक मोजमाप आहे. पण, उत्पादनाचे वाटप वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. वाटप कसेही झाले तरी सामाजिक सौख्याची बेरीज सारखीच राहील काय? उत्पादनातून जमीनदारांना भाडेपट्टी मिळेल, कामगारांना मजुरी मिळेल, भांडवल पुरविणाऱ्यांना व्याज मिळेल आणि उद्योजकांना फायदा मिळेल. अशा तऱ्हेने राष्ट्रीय संपत्तीचे वाटप होईल. पण, अशा वाटपाने राष्ट्रीय संपत्तीतून मिळणारे आर्थिक सौख्य सर्वोच्च पातळीचे ठरेल याची काहीच खात्री नाही. उत्पादनाच्या वेगवेगळ्या घटकांना मिळालेला मोबदला त्यांचा उत्पादनातील सहभाग लक्षात घेता योग्यच आहे असे मानले तरी वेगवेगळ्या घटकांच्या हातात येणाऱ्या उत्पन्नातील तफावत फार मोठी असेल तर साऱ्या समाजाचे मिळून आर्थिक सौख्य कमी भरेल.

 वर घेतलेल्या उदाहरणात 'अ'ला दहा भाकरी दिल्या आणि 'ब'ला दोनच दिल्या तर 'अ'ला अजीर्णाचा त्रास आणि 'ब'ला अर्धपोटी राहण्याचा अशी अवस्था होऊन जाईल. त्यापेक्षा, दोघांनाही सहा सहा भाकऱ्या

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१०३