पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बांधता आला असता; पण, तोदेखील फारसा शास्त्रीय ठरला नसता. भुकेने तयार होणाऱ्या एक औंस आम्लाचा परिणाम 'अ' आणि 'ब' या दोघांवरही सारखाच होईल असे मानण्यास काहीच आधार नाही. 'अ'ला पूर्वायुष्यात उपासमार काढण्याची सवय असली किंवा तो वजन आणि आकारमान यांत कमी असला तर त्याची भुकेच्या तीव्रतेची जाणीव 'ब'पेक्षा वेगळी असू शकेल. काही माणसे अती भूक लागली म्हणजे चिडचीड, रागराग करतात. दुसरी काही माणसे शक्तीचा व्यय टाळण्याकरिता निमूटपणे शांत झोपून घेतात. थोडक्यात, भुकेला काही मोजमाप नाही आणि दोन माणसांच्या भुकेची तुलनाही नाही.
 दोघांचीही भूक चोवीस तासांची, पण तिची तीव्रता ज्याला त्याला जाणवणारी वेगळी; त्यांची तुलना अशक्य. तसेच, भुकेच्या समाधानाने होणाऱ्या आनंदाची तुलनाही अशक्य. 'अ' आणि 'ब' यांनी भाकरीचा पहिला घास खाल्ला तेव्हा परब्रह्म भेटल्याचा आनंद दोघांनाही होणार. पण, दोघांच्या परब्रह्म आनंदाची तुलना करण्याची शक्यता नाही. प्रत्येकाच्या अनुभवातले परब्रह्म हेही वेगळे वेगळेच असते.

 भाकरी खाण्यापासून 'अ' आणि 'ब' यांना मिळणाऱ्या समाधानाबद्दल एक गोष्ट निश्चित सांगता येईल. पहिला घास खाताना उच्च कोटीचा आनंद झाला. पुष्कळदा भुकेल्या घशाला कोरड पडलेली असते. चवीची जाणीवसुद्धा होत नाही. दुसरा, तिसरा, चौथा घास अधिकाधिक गोड लागत जातो. काही काळानंतर का होईना, पाचपन्नास घासांनंतर भूक शमते आणि प्रत्येक नव्या घासाने मिळणारे समाधान आधीच्या समाधानाच्या तुलनेने कमी कमी होऊ लागते. पहिली भाकरी संपेपर्यंत समाधान वाढत राहील असे समजू. दुसरी भाकरी समोर आली की तिच्या दर्शनाने होणारा आनंद पहिल्या भाकरीच्या तुलनेने दोघांच्याही बाबतीत कमीच झालेला असणार; तिसऱ्या भाकरीच्या वेळी त्याहूनही कमी, चौथी भाकरी समोर आली तर 'आता नको, पोट भरले' अशी अवस्था होईल. तरीही आग्रह चालूच राहिला तर काही काळाने भाकरीमुळे सौख्य मिळण्याऐवजी त्रास वाटू लागेल, ती गिळवणार नाही, गिळलेल्या भाकरीचेही अपचन होईल. सारांश, भाकरीच्या घासागणिक तिच्या सेवनातून मिळणारा आनंद 'अ' आणि 'ब' या दोघांच्याही बाबतीत

१०२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने