पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०. सौख्याचे अर्थशास्त्र


 कोणाही माणसाला तहानभूक भागविण्यासाठी काही प्यायला मिळाले, खायला मिळाले म्हणजे आनंद वाटतो. थंडीवाऱ्यापासून संरक्षण व्हावे यासाठी कपडे, निवारा मिळाला म्हणजे संतोष होतो. संसार थाटला की गृहस्थीच्या जीवनात मुलाबाळांना आनंदाने खेळताबागडता यावे यासाठी, खाणेपिणे, कपडे, निवारा, करमणूक यासाठी अनंत साधने हवीहवीशी वाटतात. माणसाच्या या सर्व जन्मजात प्रेरणा आहेत. खावे, प्यावे, उपभोगावे, आनंद लुटावा यासाठी माणूस जन्मभर खटाटोप करतो.
 उपभोग वाढविण्याची प्रत्येक प्राणीमात्राची इच्छा असते हे खरे; पण, अशा तऱ्हेने सर्व प्रयत्नांनी ऐहिक सुखसंपदांच्या मागे लागणाऱ्या व्यक्तींचा समाज सुखीसमाधानी, आनंदी राहील का? समाजाला मन नाही, राष्ट-ांना बुद्धी नाही; तेव्हा त्यांच्याकरिता भल्याचे काय हे ते बोलत नाहीत. मग साऱ्या देशाकरिता उत्पादन, वितरण इत्यादी अर्थकारणासाठी भल्याची व्यवस्था कोणती? हे जाणण्यासाठी काही फूटपट्टी आहे काय? समाजाच्या सौख्याचे मोजमाप करता येईल काय? अमेरिकेतील लोकांचे सौख्य अमुक अमुक एकक, हिंदुस्थानातील लोकांचे सौख्य इतके इतके एकक असे काही मोजता येईल काय? निदान, दोन देशांची तुलना करून त्यातील एक सौख्यात वरचढ आहे, दुसरा काही कमी आहे असेतरी म्हणता येईल काय? हे सारे प्रश्न सोडविण्यासाठी केवळ अर्थशास्त्राचा आधार पुरेसा नाही. जीवशास्त्र, समाजशास्त्र, अगदी तत्त्वज्ञानाचादेखील आधार घ्यावा लागेल.

 उदाहरणाने हा प्रश्न समजावयास थोडा सोपा होईल. समजा 'अ' आणि 'ब' ही दोन माणसे आहेत. दोघांनीही शेवटचे जेवण चोवीस तासांपूर्वी घेतले. त्यानंतर त्यांना काहीच खायला मिळाले नाही. चोवीस तासांनी एकएक भाकरी मिळाली आणि त्यांनी ती भाकरी खायला सुरुवात केली. दोघांच्याही पोटात कमालीची भूक आहे. दोघांनाही, कधी एकदा काहीतरी पोटात जाते अशी वखवख लागलेली. पण, ही भुकेची आर्तता मोजायची कशी? जर माणसाच्या जठरात भुकेमुळे उत्पन्न होणाऱ्या आम्लाचे मोजमाप, शरीरविच्छेदन न करता घेता येत असते तर भुकेच्या तीव्रतेचा काहीसा अंदाज

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१०१