पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निघते. कोणी हिंदुत्वाचा अभिमान सांगू लागला तर त्याची दखल गंभीरपणे घेण्याची गरज नाही. जन्माच्या अपघाताने न मिळालेल्या एखाद्या गोष्टीचे कोणी कौतुक केले तर ते विशेष मानावे. परधार्जिणेपणा हा काही गुण नाही तो दोषच, पण हा दोष क्षुद्र स्वाभिमानाच्या दोषाच्या तुलनेने तसा विरळा!
 या जाणीवांनी मी अस्वस्थ झालो. आणि तेव्हापासून सगळ्या विश्वाच्या आणि माझ्या स्वत:च्या उत्पत्तिलयाच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या लहान वयातही मी एक मोठा अकटोविकट प्रयत्न केला. जन्माच्या अपघाताने मिळालेली अभिमान स्थळे खऱ्याखुऱ्या विचाराची सुरवातच होऊ देत नाहीत. अभिमान रुजले असले की सगळा विचार या अभिमान-स्थळांची नवी-नवी समर्थने शोधण्याच्या कामातच अडकून गुरफटून जातो. याला उपाय काय? त्याकाळी श्रीमद् भगवद्गीता, श्रीमद् आद्य शंकराचार्य आणि आर्य चाणक्य माझी अभिमानस्थळे होती. यांचा उल्लेख करायचा झाला तर पहिल्या उपपदाऐवजी एखादा खास अभद्र शब्द वापरायचा व जन्माच्या वारशाने मिळालेल्या बौद्धिक मानसिक गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची असा हा प्रयोग. जात तर जात नाही पण वृथा धर्माभिमान टाळण्याकरिता काही काळ दरवर्षी धर्मांतर करून एक नवा धर्म अभ्यासपूर्ण स्वीकारण्याचा मी बेत केला होता, तो हातून पार पडला नाही ही गोष्ट वेगळी.
 तुमची कविता वाचल्यानंतर थोडी आशा वाटली. मला पडलेले आणि न सोडवता आलेले प्रश्न ज्याने अल्पवयातच सोडवले आहे, अशा कोणाचे दर्शन होते काय अशी आशा वाटली. म्हणून आपल्याला हे पत्र लिहीत आहे. आपला कुलीनाघरी जन्म झाला, त्या कुलाचे नेमके श्रेष्ठत्व काय? एव्हरेस्ट सर करणारे, दक्षिण ध्रुवावर पोचणारे, नोबेल पारितोषिक विजेते कोणी शास्त्रज्ञ कोणी संशोधक, किंवा कोणी उत्तुंग राष्ट-सेवा घडविलेले कोणी निरफराके माझ्यातरी ऐकिवात नाही.
 अभिमान बाळगण्यासारखे गोमटे रूप आपणास मिळाले, पुण्याच्या चित्पावनी संस्कृतीत कोणी थोडे गोरे असले की त्याला सुंदर किंवा रुबाबदार मानले जाते. आपण त्यापलीकडे सुस्वरूप असणार अशी माझी खात्री आहे.

 कुशाग्र बुद्धी मिळाली याची प्रचिती आपणास केव्हा आली? आणि आपण ज्याला सुविख्यात शाळा म्हणतात तिने आपल्या राष्ट्रास ललामभूम

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२२१