पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिवरायांसारखे महाप्रतापी वीर येथे होऊन गेले. १९५७ चे समर गाजवणारे नानासाहेब, तात्यासाहेब, राणी लक्ष्मीबाई महाराष्ट-ाच्याच कुशीतल्या. या महाराष्ट्राची सर्वश्रेष्ठ जात कोणती असेल तर ती वर्णश्रेष्ठ ब्राह्मण हेही तितकेच उघड आहे. अशा ब्राह्मण कुळात आपल्या आईबापांसारखा श्रेष्ठचरितांच्या पोटी आपण जन्मलो. या अतिविशिष्ट जन्माचे भाग्य मोठे असाधारण आहे, या विचाराने काही काळ धन्य धन्य वाटले. विरासतीत मिळालेल्या या भाग्याचा सदुपयोग करण्याची जड जबाबदारी आपल्यावर असल्याचीही जाणीव झाली. या ऋणाचे उतराई कसे व्हावे, हेच समजेना. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात काही काळ गेला.
 एक दिवस सहज मनांत प्रश्न आला, ही सगळी जन्माच्या भाग्याची उतरंड कितपत खरी आहे? एकामागोमाग एक प्रश्न मनांत येऊ लागले. पृथ्वी सर्वश्रेष्ठ ग्रह असे मानायला काय आधार आहे? इतर ग्रहांविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. एवढ्या विश्वाच्या अवकाशात याहीपेक्षा मोठे, याहीपेक्षा सुंदर, माणसापेक्षा प्रबुद्ध आणि उन्नत प्राणी अंगाखांद्यावर खेळवणारे ग्रह नसतील कशावरून? पृथ्वीवर म्हटले तरी, भारतवर्षात काय आहे की जे इतर कोणत्याच देशात नाही? निसर्ग जास्त करून दरिद्री, संपन्नता पहावी तर सर्वात गरीब, निरक्षर, भुकेल्यांचा हा देश. इतर देशांमध्ये शूरवीर आणि कर्तबगार रमण्या झाल्या नाहीत असे थोडेच आहे? महाराष्ट- तर बोलून चालून काटेरी झाडांचा आणि दगडाधोंड्यांचा दुष्काळी प्रदेश. आणि ब्राह्मणवर्गाचे श्रेष्ठत्व ते कोणते? त्यांनी तयार केलेली संस्कृती जेव्हा जेव्हा दुसऱ्या कोणाच्याही संपर्कात आली तेव्हा पराभूत झाली. आपल्याच समाजातील बहुसंख्यांना विद्येचा, धर्मग्रंथवाचनाचा, मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाकारणारी ही वर्णसंस्कृती, यात शरम वाटण्यासारखे काही नसेल, पण विशेष अभिमान बाळगण्याचीही काही गरज दिसत नाही.

 मग भाग्याच्या उतरंडीचा हा विचार मनात आलाच का? डोक्यात प्रकाश पडला, जन्माच्या अपघाताने जे जे मिळते तेच पवित्र, तेच उदंड, तेच थोर; त्याचाच अभिमान बाळगावा असे वाटणे ही प्राणीमात्राची साहजिक प्रवृत्ति आहे. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या वारशाचा कोणतेही प्रश्न न विचारता अभिमान बाळगणे हे इतरांच्या वारशाविषयीच्या अज्ञानातूनच

२२०
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने