परिशिष्ट २
व्यक्ति विकास इदम् न अलम्?
श्री. अशोकराव निरफराके यास,
सप्रेम नमस्कार,
आपला माझा परिचय नाही, आपण कोण कुठले, वय काय हेही मला
माहिती नाही. 'संवाद' नावाच्या कोणा मासिक पत्रिकेच्या संपादकाने
जानेवारी १९९७ चा 'युवा' विशेषांक पाठवला. अशी प्रकाशने झटकन चाळून
दूर केली जातात. कविता तर सहसा वाचण्याच्या भानगडीतच मी पडत नाही.
आपल्या कवितेच्या आकृतिबंधावरून ते मुक्तकाव्य वा गद्यकाव्य नसून
मात्रांची शिस्त पाळणाऱ्या वृत्तांचे आहे. हे दुर्मिळ लक्षात आले, त्यामुळे काही
कुतुहल वाटले. त्यात 'ततः किम्?' असे मोठे आकर्षक संस्कृत शीर्षक पाहून
अधिकच उत्सुकता वाटली. कविता वाचली, दोनतीनदा वाचली. इतरांना
वाचून दाखवली. काहींना वाचायला दिली आणि आज तुम्हाला हे पत्र
लिहिण्यास बसलो आहे.
एवढे कुतुहल जागृत करण्याची आपल्या कवितेची ताकद आहे, हेही
दुर्मिळ. त्याबद्दलच प्रथम आपले अभिनंदन केले पाहिजे.
कवितेचा थाट सावरकरी आणि भाषेचा प्रवाह रामदासी आहे. असे
लिहिणे प्रचितीशिवाय होत नाही. कवितेच्या नायकाची कर्तबगारी हे कवीचे
स्वप्नरंजन नाही हे स्पष्ट आहे. स्वातंत्र्यवीरांच्या कवितेत जसा स्वतःच्या
बृद्धिविषयी, धडाडीविषयी, शौर्याविषयी, राष्ट-प्रेमाविषयी अहंकार दिसतो
पण टोचत नाही; तसेच आपल्या कवितेतही आहे. आत्मगौरवाची जाणीव
मोठी सुखकारक असते!
मी सातवीआठवीत असतांनाचा एक अनुभव. एक दिवस कोण्या निमित्ताने कोण जाणे, मनात विचार आला. केवढे आपण भाग्यवान! या साऱ्या अनंत विश्वात परमेश्वराचा कोणता लाडका ग्रह असेल तर तो म्हणजे पृथ्वी हे नि:संशय. या पृथ्वीतलावर भारतवर्षासारखी सुजलाम् सुफलाम् नरवीरांची खाण, नारीदेवतांचे पूज्यस्थान अशी पुण्यभूमी दुसरी नाही. या भारतभूमीत महाराष्ट- नि:संशय सर्वश्रेष्ठ. कारण ज्ञानेश्वरांसारखे संत आणि