पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतातमात्र अजूनही स्वकर्तृत्वावर उभे राहण्याची हिम्मत नसलेले आणि सरकारी दक्षिणांना चटावलेले त्याला विरोध करू पहात आहेत. स्वतंत्रतावाद हे परदेशी वाण आहे, स्वतंत्रतावाद म्हणजे भांडवलशाही, स्वतंत्रतावाद म्हणजे चैतन्यवाद, नैतिक स्वैराचाराचा पुरस्कार आणि चंगळवादाला उत्तेजन अशा बेफाट टीका 'बळीराज्या'चे विरोधक करत आहेत. त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हरघडी येत आहे. सुशिक्षित आंग्लभाषी प्रचारकांनी असले युक्तिवाद केले म्हणजे सामान्य शेतकरी कार्यकर्ता गोंधळून जातो. त्याच्या स्वत:च्या मनातील गोंधळ संपावा आणि स्वतंत्रतावाद आणि 'बळीराज्य' यांच्या विरोधकांना मुद्देसूद आणि चोख उत्तर त्याला देता यावे यासाठी विचारांच्या वेगवेगळ्या बारकाव्यात जाऊन ही मांडणी केली; स्वतंत्रतावादाच्या पाईकांना त्याचा थोडाफार तरी उपयोग होईल अशा आशेने.

(२१ ऑगस्ट १९९६)

२१८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने