पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण बाजारपेठेच्या व्यवस्थेत उत्पादन वाढ करून उपभोग वाढवण्यासाठी धडपड चालू असते ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. धडपड उपभोग वाढवण्याची नाही. धडपड विविधता आणि विपुलता वाढवण्याची आहे. तिचा हेतू लोकांना निवडीचे अधिकाधिक स्वातंत्र्य देण्याचा आहे. क्षणोक्षणी उपभोग तर अपरिहार्यच आहे, हे जनावरांच्या बाबतीतही खरे, माणसांच्या बाबतीतही खरे. जनावरात आणि माणसात फरक काय? जनावरे निसर्गाने लादलेल्या अटी निमूटपणे मान्य करतात. निसर्गाने त्यांच्यासमोर जी विविधता ठेवली असेल त्यातूनच निवड करतात. माणूस निसर्गापलीकडे विविधता तयार करतो. निवडीची संधी जास्तीत जास्त वेळा मिळावी, प्रत्येक निवडीत अधिकाधिक पर्याय समोर मिळावेत, त्या पर्यायांचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक असावे, यासाठी ही धडपड आहे. उत्पादनवाढ उपभोग वाढवण्यासाठी नाही, जो काही उपभोग घ्यायचा त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आहे.
 'चंगळवादी' याबरोबर 'पर्यावरणविनाशी' अशीही एक शिवी स्वतंत्रतावादाला त्याचे विरोधक देत असतात. समाजवादी रशियाच्या पतनानंतर समाजवादी व्यवस्थाच पर्यावरणाला किती घातक ठरली, आख्खे समुद्र प्रदुषणाने कसे खलास झाले, त्याविरुद्ध बोलण्याची कोणाची हिम्मत न झाल्याने निसर्गाचा कसा विनाश नियोजकांनी केला याचे नवे नवे पुरावे हररोज उपलब्ध होत आहेत. पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच चिंता आहे. या विषयावर बोलणारे फार, पण निसर्गाचे संरक्षण नेमके कशाने होते याबद्दल नेमके शास्त्र काहीच नाही. प्रगतीला विरोध, विकासाला विरोध करणारे स्वत:चाच पर्यावरणवादी म्हणून उदेउदे करून घेतात. निसर्गाच्या रक्षणाकरिता जागरुक जनमत हे एकच साधन आजतरी आशेचा किरण दाखवते आणि जागृत जनमत स्वतंत्र व्यवस्थेतच शक्य आहे. स्टॅलिनच्या राजवटीत जागृत जनमत कुठून यावे?
उपोद्घात -

 स्वतंत्रतावाद शेतकरी संघटनेच्या विचारसरणीचा आरंभापासून पाया राहिला आहे. नियोजन व्यवस्थेचे सर्वात क्रूर बळी शेतकरी, स्वतंत्रतावादाचा झेंडा सरसावून बाहेर पडले. जगभर त्याच्या 'बळीराज्या'ची द्वाही फिरत आहे.

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२१७