भामटी भूमिका आहे.
पूर्वाश्रमीच्या समाजवाद्यांना आणि साम्यवाद्यांना आता चंगळवादाचा
एकदम तिटकारा आला आहे. उत्पादनवाढीचा महामार्ग खोलण्याची बढाई
मारणाऱ्या मार्क्सवादाचे आपण टाळकरी आहोत हे ते विसरून जातात.
संगमरवरी रेल्वे स्टेशने, लोखंडपोलादाचे प्रचंड कारखाने, शस्त्रास्त्रांची प्रचंड
निर्मिती करणारी व्यवस्था दर घरटी दोन अंडी पोचवू शकत नाही याची त्यांना
शरम, चिंता नाही. 'चंगळवादा'च्या विरोधाचा तो मोठा विजय झाला असे ते
मानतात!
कर्म अटळ, उपभोगही अटळ
'चंगळवाद' हा आरोप आहे तरी काय? माणसाने खा खा करू नये,
मी भोगीन भोगीन अशा लालसेचा अतिरेक करू नये. कोणत्याही वस्तूचा
आस्वाद हा योग्य मर्यादेत उपभोग घेतल्यानेच होतो. अतिरेक झाला तर
अमृतसमान दूधसुद्धा विषप्राय होऊन जाते हे कोणीच नाकारत नाहीत.
अतिरेकी उपभोगाचा सतत पाठपुरावा करणारा मूर्खच म्हटला पाहिजे.
जीवनाच्या ताटात विविध चवीच्या, रुचीच्या, स्वादाच्या पदार्थांची रेलचेल
आहे, त्यात मी फक्त गोड पक्वान्नच खाईन असे म्हणणारा करंटाच
समजायचा, दुसरे काय?
असे अतिरेकी प्रकार सोडले तर उपभोग कमी कसा करता येईल.
भारतीय कर्मवादात एक मोठा चलाखीचा युक्तिवाद आहे. कर्म टळतच नाही.
तुमची इच्छा असो, नसो, तुम्ही कर्म करीतच राहता. निदान श्वास चालू
राहतो आणि शरीराचे इतर चलनवलनही चालू राहते. तेव्हा, कर्माचा संन्यास
शक्य नाही असा हा युक्तिवाद आहे. उपभोगाबद्दलही तसाच युक्तिवाद करता
येईल. प्रत्येक कर्म हा एक उपभोगच असतो. काही न करता एका जागी
सन्यस्त वृत्तीने बसलेला तपस्वीदेखील भगव्या छाटीचातरी उपभोग घेत
असतो; बैठकीचे स्थान, व्याघ्रजीन, कमंडलू, झाडाची सावली यांचातरी
उपभोग घेत असतोच; हवेचा पाण्याचा आस्वाद घेत असतो आणि काही
नाही तरी निदान नग्न निरुपभोगाचा आस्वाद घेत असतो. उपभोग अटळ आहे
तो कुणालाच सुटलेला नाही.
उपभोगातील विविधतेसाठी