पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले. गरजेच्या वस्तूंचीदेखील आबदा झाली. पाव, अंडी, दूध, फळे, मांस या चैनीच्या वस्तू झाल्या. भांडवलवादात समाजाच्या उत्पादक शक्तींचा पुरेपूर वापर होत नाही या सबबीखाली उभ्या राहिलेल्या नियंत्रित व्यवस्थेत उत्पादनाचाच पार बट्याबोळ झाला.
कोरड्या पाषाणांचे ब्रह्मज्ञान
 शाळेत मुलामुलांची वादावादी होते आणि रोडकी, खुजी मुले उंच सुदृढ बांध्याच्या सवंगड्यांचीच 'पहिलवान हिरो' म्हणून कुचेष्टा करू लागतात; तसा काहीसा प्रकार बाजारपेठवादी आणि नियोजनवादी यांच्यात घडला आहे. खुरटलेल्या खुज्या वाढीचे नियोजनवादी स्वतंत्रतेच्या चाहत्यांची 'चंगळवादी' म्हणून कुचेष्टा, उपहास करू लागले आहेत.
 खुली व्यवस्था म्हणजे निव्वळ उत्पादन, कार्यक्षमता, स्पर्धा; साऱ्यांची धावपळ अधिक मिळकत कमावण्यासाठी, सारे काही बाजारपेठेसाठी; मनुष्याच्या जीवनात उपभोगाखेरीज इतरही काही महत्त्वाची मूल्ये आहेत, ती स्वतंत्रतावादी मानायलाच तयार नाहीत; केवळ उपभोगावर आधारलेली 'चंगळवादी' व्यवस्था नीतिमूल्ये बिघडवील, पर्यावरणाचा नाश करतील इत्यादि इत्यादि आरोप नियोजनवादी स्वतंत्रतावाद्यांवर करीत आहेत.

 गंमत अशी की हे आरोप करणाऱ्यात कोणी अध्यात्मवादी, गांधीवादी फारसे नाहीत. देशातील मायबहिणींना अंगभर नेसायला वस्त्र नाही म्हणून पंचा नेसणाऱ्या कोण्या महात्म्याने 'चंगळवाद' म्हणून टीका केली असती तर समजले असते. पण आधुनिक पेहराव करणारे, वीज वापरणारे, टेलिव्हिजन पाहणारे, टेलिव्हिजनच नव्हे तर पेजर आणि सेल्युलरही वापरणारे, सदानकदा गाड्यांनी धावणारे; विमानाने उडणारे, पंचतारांकित सभागृहात बसून चंगळवादी म्हणून स्वतंत्रतावाद्यांची कुचेष्टा करू लागले की मोठा विनोदच म्हणायचा! यांचा खरा विरोध उपभोगाला नाही; यांना सारे उपभोग हवे आहेत. पण ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले तर आपले महत्त्व संपून जाईल याची त्यांना धास्ती पडली आहे. उपभोगाच्या विविध वस्तू ज्यांच्या अथक परिश्रमाने तयार झाल्या; रोगराई, आजार यांच्यावर रामबाण उपाय ज्यांनी कठोर तपस्येने शोधून काढले त्यांच्याबद्दल अनादर बाळगून आणि त्यांना गुरुदक्षिणाही न देता उपभोगांची लयलूट आपल्या दारी उभी रहावी अशी ही

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२१५