पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही सर्व बौद्धिक, मानसिक तयारी खुलेपणे जीवनाचे प्रयोग करण्यात वापरावी. हे प्रयोग करताना, तसे प्रयोग करणाऱ्या दुसऱ्या कुणाच्या पावलाआड आपले पाऊल पडणार नाही याची काळजी घ्यावी; हा स्वतंत्रतावाद आहे. त्यात 'अनैतिकतेला प्रोत्साहन नाही, 'ननैतिकते'च्या यात्रेचे निमंत्रण आहे.
बंधनमुक्ती - पहिली पायरी
 खुली अर्थव्यवस्था ही स्वतंत्रतेची एक प्राथमिक पायरी आहे. बाजारेपठेची व्यवस्था म्हणजे स्वतंत्रता नाही. पण ज्या समाजात माणसाला मालमत्तेचा अधिकार नाही आणि हरघडीच्या उत्पादनात, व्यापारात आणि इतर आर्थिक घडामोडीत शासनाचा कसाही वेडवाकडा हस्तक्षेप होण्याची भीति आहे तेथे स्वातंत्र्य उपजावेच कुठून?
 बाजारपेठेच्या व्यवस्थेचा एक अपरिहार्य परिणाम आहे; बाजारपेठ लोकांच्या गरजा आणि त्यांची उत्पादन-शक्ती यांचा मेळ घालून देते. सतत विस्तारणाऱ्या गरजांच्या क्षितिजांत एक एक गरजेची निकड कमी करणे; त्यासाठी लागणारे उत्पादन घटती उत्पादकता देणाऱ्या कृपण निसर्गाकडून काढून घेणे आणि निसर्गाची कृपणता ओलांडून जाण्याकरिता नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे, ऐतखाऊंना नाउमेद करणे हे बाजारपेठेचे अंगभूत गुणधर्म आहेत. अमेरिकन धाटणीच्या भांडवलवादी व्यवस्थेत बाजारपेठेत थोडा कुठे खुलेपणा आला तर तेथील व्यापारी पेठा विविध तऱ्हांच्या मालांनी गजबजून गेल्या, उपभोग्य वस्तूंची रेलचेल झाली आणि फेरीवाल्यांपासून ते महाकाय कंपन्यांपर्यंत सारेच ग्राहकराजापुढे नाकदुऱ्या काढीत आमचा माल घ्या, आमचा माल घ्या अशा जाहिराती, विनवण्या करू लागले.

 नेमकी याउलटी परिस्थिती नियंत्रित अर्थव्यवस्थांत झाली. भांडवलदारी व्यवस्थेत फायद्याच्या अमिषाने गुंतवणुकीचे निर्णय होतात ते व्यक्तीच्या फायद्याचे असतील, पण समाजाच्या फायद्याचे कसे असणार? असा प्रश्न उभा करून, समाजाच्या फायद्याकरिता गुंतवणुकीचे निर्णय नियोजन मंडळातील ढुढ्ढाचार्यांनी करणे आवश्यक आहे आणि त्याकरिता सर्वच संपत्ती, मालमत्ता सरकारी मालकीची असली पाहिजे असे म्हणणाऱ्या समाजवादी देशात नेमके विपरीत तेच घडले. गुंतवणुकीचे निर्णय चुकीचे

२१४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने