पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानतही नाहीत; थोडक्यात, जे वर्तनाने नैतिक आहेत पण नैतिकतेच्या संकल्पनांना मानत नाहीत अशांसाठी मराठी सुयोग्य शब्द नाही. अशांना आपण 'ननैतिक' म्हणू. 'अनैतिकता' आणि 'ननैतिकता' यात घोटाळा होता कामा नये.
 स्वतंत्रतावाद 'अनैतिक' नाही, पण 'ननैतिक' आहे. सर्वकाळी सर्वस्थळी लागू पडेल अशी कोणतीही नैतिकता नाही. एकच नैतिक खरे - व्यक्तीच्या विकासाआड कोणतीच बंधने येऊ नयेत. फक्त, स्वातंत्र्याच्या शोधात दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर थोडेही अतिक्रमण होऊ नये ही एकच खरी नैतिकता. वयात आलेल्या दोन माणसांनी परस्परसंमतीने खाजगीत काय करावे हा समाजधारणेचा विषय नाही. नैतिकता कोणा परमेश्वराने किंवा प्रेषिताने लिहून ठेवलेली घट्ट चौकट नाही, स्वातंत्र्याप्रमाणेच नैतिकता हा देखील प्रवास आहे, स्टेशन नाही.
करुणा व कायदा-गल्लत
 बंधने असावीत अशी मागणी सनातनी करतात; अनैतिकतेचा व्यावसायिक फायदा उठवणारे करतात. अनीतिमानांना नरकयातनांची धास्ती घालून पाहिली, कायद्याने शिक्षा देऊन पाहिली, काही साध्य झाले नाही. आता करुणावादी पुढे सरसावले आहेत. दारू पिणाऱ्यांना, मादक द्रव्य सेवन करणाऱ्यांना सहानुभूति आणि उपचारांची गरज आहे; अशा भूतदयावादी विचाराने अनेकांनी जागोजाग मोठी चांगली कामे सुरू केली आहेत. भूतदया ही समाजाची एक महत्त्वाची प्रेरणा आहे. असे काम करणाऱ्यांचे कौतुकच व्हायला पाहिजे. मादक द्रव्यांच्या सेवनाने लोळपोळ झालेल्यांची सेवाशुश्रुषा करणे हे मोठे कौतुकास्पद काम आहे; पण रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी ही थोर मंडळी बंदीच्या कायद्याचा पुरस्कार करतात ही मोठी विचित्र गोष्ट आहे. करुणा दाखवणाऱ्यांनी करुणेच्या क्षेत्रात काम करावे. करुणेचे विषय जितके दिशाहीन, भरकटलेले, विवेकशून्य तितका त्यांचा करुणेवरचा आणि भूतदयेवरचा अधिकार जास्त. करुणावाद्यांनी कायद्याने बंदीची मागणी करणे म्हणजे दोन वेगळ्या प्रज्ञांची गल्लत करणे आहे.

 शैशवात, बालपणात पूर्वापार चालत आलेले, गुरुजनांनी सांगितलेले नियम आचरावेत; शिस्त पाळावी; शरीराला संयमाचा व्यायाम द्यावा; आणि

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२१३