पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नैतिकता ती काय? या प्रश्नांची उत्तरे शोधायला लागले की सारेच निरर्थक निष्फळ वाटू लागते. अशा विफलतेत जाण्यापेक्षा पूर्वजांनी घालून दिलेले नीतिनियम आणि परंपरेने चालत आलेल्या रूढी प्राणपणाने जपाव्यात आणि सुदृढ कराव्यात अशी बंधनवाद्यांची परिस्थिती असते.
 स्वतंत्रतावाद्यांचा विचार थोडा वेगळा आहे. बंधने घालून कायदे करून रोग परवडला पण औषध नको अशी परिस्थिती तयार होते. दारूने, मादक द्रव्यांनी किंवा इतर दुराचारांनी फक्त दुराचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचेच नुकसान होते; बंदी घातल्याने सारा समाज उद्ध्वस्त होतो, ही स्वतंत्रतावादाची धारणा आहे. बंधने उठवल्याने तोटा तर होत नाही, अनेकदा फायदाच होतो. माणसाला मोकळे सोडले म्हणजे त्याची प्रवृत्ती दुराचाराकडेच वळण्याची असते ही बंधनवाद्यांची धारणा खरी नाही. कधीतरी सिनेमातले एखादे अश्लील गाणे ऐकण्यात मजा वाटते, एखादे बिभत्स अश्लिल पुस्तक वाचण्यात किंवा 'खटियावादी' नाटकसिनेमे पाहण्यात गंमत वाटते याचे कारण म्हणजे हे अनुभव दुर्मिळ आहेत. त्यातील दुर्मिळता काढून टाकली आणि चोरटेपणाचे आकर्षण संपवले तर सारीच माणसे दुष्प्रवृत्तच होतील असे मानणे म्हणजे अभिजात साहित्याचा अपमान करणे आहे. कालीदास ही काही कृत्रिमरीत्या लादलेली रुचि नाही. त्याच्या साहित्यामध्ये मनुष्याच्या अत्यंत खोल भावनांना आणि प्रवृत्तींना प्रगाढ प्रतिसाद मिळतो, जो स्वस्त साहित्याच्या आवाक्याबाहेर आहे. पूर्वी स्वीडनमध्ये अश्लिल साहित्यावर बंदी होती आणि साऱ्या बाजारपेठा अश्लिल साहित्याने भरून गेल्या होत्या. कायदा रद्द झाला आणि काही काळ हे साहित्य आणखी फोफावते आहे अशी धास्ती वाटू लागली; पण थोड्याच काळात ही बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. लोक त्याकडे बघेनासे झाले; अश्लिल साहित्यावर बंदी घालावी अशी जोरदार मागणी अश्लिल साहित्याचे लेखक आणि प्रकाशकच करू लागले.
स्वतंत्रतावाद 'ननैतिक'

 इंग्रजीत 'Immoral' आणि 'Amoral' असे दोन वेगळे शब्द आहेत. माझ्या माहितीत मराठीत हा अर्थ श्लेष साधणारे दोन वेगळे शब्द नाहीत. नीतिमत्तेच्या रूढ कल्पनांविरुद्ध जे वागतात ते अनैतिक. पण, जे अनैतिक नाहीत पण समाजातील रूढ नैतिकतेला काही मोठे अधिष्ठान आहे असे

२१२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने