पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डांबराचे डबे, दगड किंवा काठ्या घेऊन उभे राहतात. देवदेवतांच्या जीवनक्रमाविषयी मूळ ग्रंथातील वचने उद्धृत करून कोणी दोष काढले तरी त्यांच्या जीवाची शाश्वती राहत नाही. नैतिक आणि वैचारिक क्षेत्रात काही शिस्त पाहिजे, काही बंधने पाळली पाहिजेत असे सर्वांनाच वाटते. यापेक्षा वेगळे बोलणारे कुचेष्टेचा विषय होतात.
 धार्मिक, सामाजिक नीतिनियम घालून, रूढी पाडून त्यांची सामाजिक बहिष्कार, दंड अशा हत्यारांनी अंमलबजावणी करून नैतिक वैचारिक प्रथा चालू ठेवण्याचे जबरदस्त प्रयत्न पिढ्यानपिढ्या झाले, रूढी संपल्या; दुराचार बोकाळला तर सर्व समाज नष्ट होईल अशी धास्ती पदोपदी घालणारे धर्ममार्तंडही संपले. कायद्याने सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न तर शेकडो वर्षे चालू आहेत. कोणाला संमति-वयाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो; कुणाला द्विभार्या प्रतिबंधन; कुणाला सुलभ घटस्फोट; कुणाला हुंडाबळी; कुणाला दारुबंदी. जो तो आपल्या आवडीचा घोडा घेऊन विधिमंडळ किंवा लोकसभेमार्फत या विषयांवर कायदा करतो आणि कायदा संमत झाला की आपले जीविताचे सार्थक झाले असे मानतो. कायदे रूढीपरंपरांइतकेच निष्फळ आणि अकार्यक्षम ठरले आहेत. पण तरीही बंधने आवश्यक आहेत ह्या विश्वासास कोठे तडा गेलेला नाही.

 कायदेकानूंनी आणि रूढींनी एक गोष्ट साध्य होते; जे होऊ नये आणि ज्याचा प्रतिबंध व्हावा याकरिता हा सारा खटाटोप, ते थांबत तर नाहीच, उलट काही प्रमाणात आकर्षक बनते आणि त्याहीपेक्षा किफायतशीर बनते. दारू हे गरीब देशात अनर्थ घडवून आणणारे व्यसन आहे; दारूने शरीराचा ऱ्हास होतो हे सर्वांना ठाऊक आहे; पण तरीही लोक पितात. दारुबंदी झाली म्हणजे काहीजण चोरून पितात, काहीजण प्रतिष्ठेचा विषय करून पितात; आणि हातभट्टीवाल्यांपासून ते अगदी विलायती मद्ये उपलब्ध करून देणाऱ्यांपर्यंत सर्वांचा धंदा जोरदार चालतो. या एका चोरट्या धंद्यावरच लोक लखपती, करोडपती बनतात. म्हणजे, बंधनांनी आणि कायद्यांनी इच्छित हेतू साध्य होत नाही, इतकेच नाही तर जे टाळायचे तेच अधिक भरभक्कम होऊन बसते. हा सार्वत्रिक सर्वकालीन अनुभव आहे. तरी लोक बंधनांचा आग्रह धरतात.

२१०
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने