पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतंत्रतेची मूल्ये - लेखांक ४
स्वतंत्रतावाद : स्टेशन नव्हे, मार्ग


बंधनांचे दास
 स्वतंत्रतावादाची सुरुवात बंधने मोकळी करण्यापासून होते; स्वतंत्रतावादाची ही नकारात्मक कल्पनाच काय ती आजच्या माणसास पेलणारी आहे. आज माहीत नसलेल्या बंधनांचा बंदोबस्त कसा करायचा ते काम उद्याच्या पिढ्यांवर पडणार आहे. पाटीलकी, देशमुखी, सावकारकी या बेड्या एका काळी प्रेमळ वाटत असत. आजही निवडणुकीत संस्थानिकांचे पुत्र सिनेमा-नटनट्यांच्या बरोबरीने मते मिळवतात. सुरक्षिततेकरिता, पोषणाकरिता आणि प्रजोत्पादनाकरिता काही बंधने आवश्यक वाटतात, उपयोगी वाटतात; सोयीची वाटतात, एवढेच नव्हे तर सुखद वाटतात. काळाच्या प्रवाहाबरोबर ही बंधनेही जड वाटू लागतील; नकोशी होतील; जाचक आणि असह्य बनतील.
 पण उद्याची बंधने सोडा, आजच जाचक आणि असह्य वाटणारी बंधनेसुद्धा तोडण्यास किंवा मोकळी करण्यास बहुतेकजण नाराज असतात. "जग कसेही, कितीही बदलले तरी मुलीच्या जातीला शिस्त ही पाहिजेच" असे म्हणणाऱ्या आया; मुले नाटकसिनेमास जाऊ लागली की बेचैन होणारे बाप; सिनेमात किंवा दूरदर्शनवर हिंसाचार सहज चालवून घेणारे पण प्रेमाचे प्रदर्शन पाहताच संतप्त होणारे प्रत्येक पिढीतील कृष्णराव मराठे सर्वत्रच आहेत. 'अश्लिल साहित्य' फार बोकाळले आहे; नवीन पिढीला काही धरबंध राहिलेला नाही; मुले विड्या, सिगरेटी, दारू पितात, वाटेल ती शृंगारिक गाणी गातात. मादक द्रव्यांचे सेवन करतात; यामुळे अनैतिकता बोकाळत आहे; आणि या सर्वांवर कायदा करून आणि त्याची कडक अंमलबजावणी करून शासनाने काही जबाबदारी पार पाडली पाहिजे असे बहुतेकांना वाटते.

 स्वस्त लोकप्रियतेसाठी लेखक किंवा कलाकार जनसामान्यांच्या भक्तीविषयांवर आणि समाजनायकांवर चिखलफेक करतात. महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारित्र्यात तर चुकून एक गालबोट म्हणण्याइतकासुद्धा दोष नाही. असे म्हणून, त्यांच्याबद्दल कुणी काही लिहिले तर शासनाने काही कार्यवाही करण्याची वाटसुद्धा न पाहता लोक हातात

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२०९