पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागतो काय ते शोधण्याच्या धडपडीस लागावे. भारंभार पुरावे असले तरी आपल्या सिद्धांतांबद्दल साशंक रहावे. किरकोळ पुराव्याच्या आधाराने निश्चित मते बनवून त्यासंबंधी अंधश्रद्धा तयार करण्याचा मोह टाळावा अशी ही कष्टप्रद यात्रा कोट्यवधी वर्षे चालली. कालच्यापेक्षा आज थोडे अधिक परिपूर्ण असे सत्याचे आकलन झाले आणि त्याबरोबरच आपल्या अपुरेपणाची अधिक परिपूर्ण जाणीव झाली याचे कौतुक मानावे असा हा वस्तऱ्याच्या धारेवर चालण्याचा खडतर ज्ञानमार्ग आहे. स्वातंत्र्याची आकांक्षा ही आपापल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षेत्राचा संकोच दूर करून ते क्षेत्र थोडे अधिक व्यापक करणे यात आहे.
 या स्वातंत्र्याच्या प्रेरणेला देहाचा तिटकारा नाही, संसाराचे आणि ऐहिकतेचे वावडे नाही. विश्वभराच्या अंधारात मिणमिणती पणती घेऊन पुढे चालणाऱ्या वाटसरूची एक साहजिक इच्छा असते; हातातील ज्योत थोडी मोठी असावी, भणभणत्या वाऱ्याच्या सोसाट्याने ती हेलकावू नये, विझू नये. निदान एक पावलाचा प्रदेश तरी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दिसावा ही स्वतंत्रतावादाची वस्तूवादी प्रेरणा आहे. कोण्या काल्पनिक मोक्षाची तेथे आस नाही. स्वतंत्रतावाद विलायती नाही, मन:पूतवादी नाही भांडवलवादी नाही तसाच तो अध्यात्मवादी चैतन्यवादीही नाही.

(६ ऑगस्ट १९९६)

२०८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने